नाशिक: येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात येत आहेत. पण आयोजकांनी याबाबत सोईस्कररीत्या मौन बाळगले असून पाटील यांच्यावरील कारवाईबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यासाठी संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळाकडून गुरुवारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. संमेलनाच्या नियोजनातील ढिसाळपणावर टीका होत असताना लोकहितवादीचे जयप्रकाश जातेगांवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वास पाटील आणि जावेद अख्तर या दोन्ही नावांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची मंजुरी आहे असे जातेगांवकर यांनी सांगितले. 

संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. सावरकर यांच्यासह साहित्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे संमेलनाच्या वेगवेगळ्या मंडप, सभागृहाला देण्यात येतील. सर्वाचा यथोचित सन्मान होईल असा दावा त्यांनी केला.

टीका मान्य..

साहित्य मंडळाने राजकीय मंडळी व्यासपीठावर नको असे सांगितले असतानाही संमेलनास राजकीय मंडळींची उपस्थिती आहे. हे संमेलन राष्ट्रवादीमय होत असल्याची टीका होत असताना महामंडळाला ती मान्य असल्याचे जातेगांवकर यांनी सांगितले. संमेलनाची अंतिम कार्यक्रमपत्रिका व नियोजन पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

झाले काय?

विश्वास पाटील यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे पुढे काय झाले याची माहिती नसल्याची कबुली जयप्रकाश जातेगांवकर यांनी दिली. पाटील यांचे साहित्यक योगदान महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. तर जावेद अख्तर यांचेही काम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.