अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्य़ातील तब्बल तीन लाखांहून अधिक हेक्टर म्हणजे निम्म्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, द्राक्ष, सोयाबीन, लेट खरीप कांदा पिकांना सर्वाधिक फटका बसला. भात, कडधान्य थोडक्यात बचावली.
परतीच्या पावसाचा सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला. इतरत्र काही अंशी नुकसान झाले. १६१४ गावांमधील चार लाख ५२ हजार ९३१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बागलाण, निफाड, दिंडोरी परिसरांतील द्राक्ष बागांना अधिक फटका बसला
पाऊसमान चांगले राहिल्याने बहरलेली शेती परतीच्या पावसाने अक्षरश: धुवून काढली. बुधवारी रात्री पुन्हा अनेक भागास पावसाने झोडपले.
आठवडाभरातील पावसामुळे जिल्ह्य़ातील शेती उद्ध्वस्थ होण्याच्या मार्गावर असल्याचे नुकसानीच्या प्राथमिक अंदाजावरून उघड होत आहे. पावसाने तडाखा दिला नाही, असा कोणताही भाग राहिलेला नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सटाणासह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. प्राथमिक अंदाजाची अंतिम माहिती शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर व्यक्तिगत पंचनाम्याचे काम पूर्ण केले जाईल. दोन्ही महत्त्वाच्या विमा कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. ७२ तासांत जी माहिती शेतकऱ्याने देणे आवश्यक असते, ती माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत पोहोचवली गेली आहे. ज्यांनी पीक विमा घेतलेला आहे, त्यांना नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मिळेल याची तजवीज केली आहे.
– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी)