नाशिक : दमदार पावसाअभावी धरणांतील जलसाठा उंचावत नसताना दुसरीकडे अनेक भागांत पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने पेरण्यांची कामे गती घेत आहेत. चालू सप्ताहात जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक पेरण्या होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहिल्यास हंगाम महिनाभर पुढे सरकलेला आहे. जूनमध्ये कधीही १०० टक्के पेरण्या होत नाहीत. यावर्षी ती परंपरा कायम राहिली. एकाच वेळी सर्वत्र मुसळधार पाऊस न झाल्यामुळे खते, बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी आपसूक टळली.काही अपवाद वगळता जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेला. जुलैच्या प्रारंभी पावसाचे आगमन झाले खरे, मात्र कधी दमदार तर कधी रिमझिम स्वरूपात तो हजेरी लावत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १६८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे अधिक आहे. मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या चार तालुक्यांत आतापर्यंत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. येवला व निफाड तालुक्यात त्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. बागलाण, कळवण, नांदगाव, नाशिक, दिंडोरी, सिन्नर, चांदवड व देवळा या भागात १५० ते २०० मिलिमीटरच्या दरम्यान पावसाची नोंद आहे. कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत असल्याने पेरण्यांची कामे गतिमान झाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम सात हजार नऊ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. कृषी विभागाचा अहवाल शुक्रवारी अद्ययावत होतो. आतापर्यंत ३५ टक्के पेरण्या झाला आहेत. कृषी विभागाच्या मागील आठवडय़ाच्या अहवालानुसार एकूण क्षेत्रापैकी २१६४ हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात कापूस (७४.३५ टक्के), मका (५४), खरीप ज्वारी (६६), बाजरी (३१), भुईमूग (२५.६२), सोयाबीन (२४.९९), ऊस (१०) यांचा समावेश आहे. भात, नागली, इतर तृणधान्य, उडीद, इतर कडधान्य, तीळ, कारळा, इतर तेलबिया यांच्या लागवडीची टक्केवारी अतिशय कमी आहे. चालू सप्ताहात पाऊस कायम राहिल्याने पेरण्यांमध्ये १५ ते २० टक्के वाढ होऊन ते ५० टक्क्यांहून जास्त होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जूनमध्ये हमखास पावसाच्या प्रदेशात पाऊस नव्हता. जुलैमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाण्यात या भाताच्या प्रदेशात पाऊस होत आहे. एकाच वेळी पाऊस कोसळतो तेव्हा बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी उसळते. यावेळी तशी स्थिती नसल्याने बाजारात खरेदीची प्रक्रियाही शांततेत सुरू आहे.

पेरणीचे संकट नाही

मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. उकाडा कायम राहिला असता तर पावसाचा उपयोग झाला नसता. पण आता वातावरण ढगाळ असल्याने नुकसान होत नाही. जिल्ह्यात पेरणीचे संकट नाही. पुढील पाच दिवसांत जिल्ह्यातील पेरणी ५० टक्क्यांहून अधिकवर जाईल. इतिहास पाहिला तर कधीही जूनमध्ये १०० टक्के पेरण्या होत नाहीत. हंगाम एक महिना पुढे सरकला गेला आहे. त्यामुळे १५ ते २० जुलैपर्यंत पेरण्या होतात. सात ते आठ रेल्वे रॅकमधून

खते आली. शेतकरी ती खरेदी करीत आहे. पावसाचा कालावधी लांबल्यामुळे खरेदीसाठी धावपळ होईल, अशी स्थिती नाही. खत व बियाण्यांचा तुटवडा नाही.

– विवेक सोनवणे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)