पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा इशारा
नाशिक : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले जाईल, असा दिलासा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिककरांना दिला आहे. वरिष्ठ पत्रकार फोरमच्यावतीने मंगळवारी सकाळी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात पांडे यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईंची माहिती दिली. पोलिसांनी अलीकडेच दोन हुक्का पार्लरवर कारवाई केली होती. शहरात हुक्का पार्लरसारखे अवैध धंदे सुरू असल्याची बाब उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. ज्या यंत्रणेकडे परवाना देण्याची जबाबदारी आहे, त्यांनी कारवाईदेखील प्रभावीपणे करायला हवी, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी ३१ ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारांवर कारवाई केल्याचा दावा पांडे यांनी के ला. पूर्वी पंचवटीसारखे काही भाग गुन्हेगारीचे केंद्रबिंदू होते. आता उपनगर, नाशिकरोड भागात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. गल्ली-बोळात दादागिरी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांची धिंड काढण्याचा पर्याय यावेळी मांडला गेला. यावर पांडे यांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर तशीच कठोर कारवाई करण्याचे मान्य केले. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. विनापरवानगी रस्त्यांवर आंदोलन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील. रस्ते वाहनधारक, नागरिक, विद्यार्थ्यांसाठी असून ते मोकळेच राहायला हवेत. आंदोलनामुळे रुग्णवाहिका, वाहनधारक अडकून पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पांडे यांनी अवैध धंदे, अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन यावरील कारवाईची जबाबदारी संबंधित विभागाची असल्याची जाणीव करून दिली होती. ज्या विभागाकडे परवाना देण्याचा अधिकार, कारवाईची जबाबदारीही संबंधितांची आहे. त्यांना गरज भासल्यास पोलीस यंत्रणा आवश्यक ती मदत करेल. अलीकडेच पोलिसांनी दोन अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. पोलिसांमार्फत चाचणी कारवाया केल्या जातील, असे पांडे यांनी सूचित केले.
पोलीस चौक्यांना अकस्मात भेट अन् पायी फेरफटका
शहरात एकूण ७० पोलीस चौक्या असून कोणत्याही एका चौकीला सायंकाळी अकस्मात भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी आसपासच्या परिसरात पोलीस आयुक्त पांडे हे पायी फिरून नागरिकांशी संवाद साधतील. सध्या दर शनिवारी आयुक्त एका पोलीस ठाण्यास भेट देत आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रार अर्जावर तीन प्रकारची कारवाई होणे अपेक्षित आहे. प्राप्त अर्जानुसार गुन्हा दाखल करणे, अदखलपात्र गुन्ह्यची नोंद अथवा संबंधित प्रकरण पोलीस खात्याशी संबंधित नसल्यास तक्रारदाराला लेखी स्वरूपात ती माहिती दिली जायला हवी. पोलीस ठाण्यातील भेटीदरम्यान आढावा घेतला जातो. तक्रारदार, नागरिकांशी संवाद साधला जातो, असे पांडे यांनी सांगितले.