वेळेच्या मुदतीपूर्वीच दुकाने बंद करण्याची सक्ती; शासकीय यंत्रणेत असमन्वय
नाशिक : तब्बल अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गुरूवारी सायंकाळनंतरही बाजारपेठा खुल्या राहतील ही व्यापाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. दुकानांसाठी वेळेचे बंधन हटविल्याचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने आणि आस्थापना रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा मिळाली. तथापि, हा निर्णय अमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. मध्यवर्ती बाजारपेठेसह इतरत्र पालिका आणि पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करत सायंकाळी पाच वाजताच दुकाने सक्तीने बंद करायला लावली. यंत्रणेतील असमन्वयाने पहिल्या दिवशी गोंधळाचे दर्शन घडले.
अडीच महिने लागू असणारी टाळेबंदी शिथील करण्याच्या दिशेने पावली टाकली जात असताना शहरात करोनारुग्णांची संख्या विस्तारत आहे. या टप्प्यात सर्व प्रकारची दुकाने, व्यावसायिक आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली. सम-विषमच्या निकषावर दुकाने उघडी ठेवण्याचा प्रयत्न प्रारंभी व्यापाऱ्यांच्या असहकार्यामुळे फसला. त्यातही सुरक्षित अंतर राखणे, दुकानात गर्दी होऊ न देणे, मुखपट्टीचा वापर आदी नियमावलीचे अनेकांकडून उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या संयुक्त बैठकीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्य़ातील दुकानांना वेळेचे बंधन किंवा मर्यादा राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले. शहर, ग्रामीण भागात गुरूवारी त्याची अमलबजावणी झाली. याआधी शहरातील दुकानांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळमर्यादा होती. ते बंधन हटल्याने रात्री नऊ पर्यंत दुकाने उघडे ठेवता येणार असल्याचे पालिका उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. एरवी अनेक उपनगरांमध्ये काही दुकाने रात्री १०, ११ वाजेपर्यंत सुरू असतात. पण, सद्यस्थितीत वेळेचे बंधन नसले तरी त्या वेळेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार नाही. त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
जिल्हा प्रशासनाच्या आधीच्या निर्देशानुसार शहर, ग्रामीण भागात रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता अनावश्यकरित्या फिरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास प्रतिबंध आहे. अर्थात या कालावधीत संचारबंदी लागू
आहे. या निकषामुळे व्यापाऱ्यांना रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवता येणार होती. वेळेची मर्यादा काढल्याने बाजारपेठेत गर्दी होणार नसल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. पण या दिवशी नेहमीप्रमाणे गर्दी राहिली. प्रदीर्घ काळानंतर सायंकाळनंतर बाजारपेठा खुल्या राहतील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. बराच काळ रखडलेली खरेदी करता येईल असे ग्राहकांना वाटत होते. तथापि, या सर्व अपेक्षांवर आणि खुद्द जिल्हा प्रशासनाच्या निर्णयास शासकीय यंत्रणांनी हरताळ फासला.
रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मध्यवर्ती भागात महापालिका, पोलिसांची वाहने नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला लागली. सायंकाळी पाच वाजले असून दुकाने बंद करावीत, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात आले. परिणामी, व्यापाऱ्यांचा नाईलाज झाला. कारवाई होईल या भीतीपोटी बहुतेकांनी दुकाने बंद करून घेतली. मुळात, गुरूवारी शहरात नऊ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात विपरित घडले. संयुक्त बैठकीत घेतला गेलेला निर्णय पालिका, पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. यामुळे नेहमीप्रमाणे पाच वाजता संबंधितांनी दुकाने बंद करण्याची सक्ती केली. वरिष्ठ पातळीवर घेतले गेलेले निर्णय एकतर कनिष्ठ स्तरावर पोहचले नाही आणि शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे अधोरेखीत झाले.
प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित सर्व भागात सम-विषमच्या निकषांनुसार दुकानासाठी वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत. ही सर्व दुकाने गुरूवारपासून रात्री नऊ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना उघडी ठेवता येतील. याबाबतची सूचना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. कोणी त्याआधी दुकाने बंद करण्याची सक्ती करीत असेल तर कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नव्या निर्णयाबाबत सूचित केले जाईल.
– प्रदीप चौधरी (उपायुक्त, महापालिका)