नाशिक : चांदवड तालुक्यात अपघाताची मालिका सुरू असून गुरुवारी दुपारी वडाळीभोईजवळ झालेल्या अपघातात अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे (५५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे दोन दिवसाच्या सुटीवर नाशिक येथे आपल्या घरी गुरुवारी चारचाकी वाहनाने येत असताना दुपारी हा अपघात झाला. सोग्रस फाटा पार केल्यानंतर वडाळीभोईजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळून नाल्यात उलटली. वाहनाचा वेग अधिक असल्यामुळे उलटल्यानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला.
ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, वडाळीभोई पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळावर पोहचले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून ससाणे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी चांदवड रुग्णालयात नेण्यात आला.