वाद, हाणामारी, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतची दारूची दुकाने बंद झाल्याने इतर उर्वरित दारूच्या दुकानांकडे मद्यपींनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मद्यविक्री दुकाने परवानाप्राप्त असल्याने एकीकडे त्यांच्यावर काय कारवाई करावी, असा पेच पोलिसांपुढे आहे. तर दुसरीकडे कारवाई होत नसल्याने नागरिक पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त करताना दिसत आहेत.
अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील जवळपास निम्मी दुकाने बंद झाली. त्यामुळे मद्यप्रेमींची खरेदीसाठी अंतर्गत रस्त्यांवरील दारू दुकानांमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. ज्या भागात ही दुकाने आहेत, तिथे वाहनांची कोंडी होत असल्याने कोंडीचा फटका नागरिकांना बसतो आहे. मद्याच्या दुकानाबाहेर एटीएम केंद्राप्रमाणे रांग पाहावयास मिळते. त्यातून शाब्दिक वाद, मद्यपींचा गोंधळ, हाणामारी व शिवीगाळ होत असल्याने स्थानिक रहिवाशांना दारू दुकानांचा त्रास होऊ लागला आहे.
सातपूर व सिडको परिसरात महिलांनी एकत्र येत मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी दारूच्या दुकानाची तोडफोड करत मद्यपींना चोप देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. असे प्रकार घडल्यावर पोलीस स्थानिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करतात. दारूची सुरू असणारी दुकाने परवाना प्राप्त असल्याने त्याच्यावर काय कारवाई करावी, असा प्रश्न यंत्रणेला भेडसावतो. रहिवासी भागातील मद्याचे दुकान बंद करण्यासाठी नागरिक अर्ज देतात.
मद्यपींचा वावर मुली व महिलांना त्रासदायक ठरत आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. पोलीस येतात आणि फेरफटका मारून निघून जातात. या पलीकडे फारसे काही घडत नाही. दुकानाचा मालक राजकीय नेता असल्याने तो सर्वावर दबाव आणतो. यामुळे आमच्या विरोधाकडे कोणी लक्ष देत नसल्याची तक्रार सिडकोतील नागरिकाने केली. दारू दुकानदारावर कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गर्दी व्यवस्थापनाचा प्रश्न
महामार्गालगतची दारूची दुकाने बंद झाल्यामुळे स्थानिक पातळीवर गर्दी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपी भररस्त्यात कुठेही वाहने उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. दुसरीकडे मद्य खरेदीसाठी होणारी गर्दी. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन ही डोकेदुखी ठरत आहे. शहरातील सर्व दुकाने सरकारमान्य परवानाधारक आहेत. महामार्गालगतची दुकाने बंद झाल्याने त्यांच्यावरील भार वाढला आहे. त्या दुकानांवरील गर्दी आणि त्यामुळे होणारे गैरप्रकार पाहता पोलीस गस्त घालत आहेत. काही संवेदनशील ठिकाणी दुकाने सात नंतर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त)