बिबटय़ा नेमका गेला कोठे?..

वन विभागाने पोलिसांच्या मदतीने तारवालानगर ते मेरी परिसर पाच ते सहा वेळा पिंजून काढला.

leopard
प्रतिनिधिक छायाचित्र

वन विभागासह पोलिसांची धावपळ

मेरी परिसरात बिबटय़ा दृष्टिपथास पडल्याच्या तक्रारी झाल्यावर वन विभागासह पोलिसांची धावपळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळेला सोमवारी सुटी देण्यात आली. वन विभागाने पोलिसांच्या मदतीने तारवालानगर ते मेरी परिसर पाच ते सहा वेळा पिंजून काढला. मात्र बिबटय़ा किंवा त्याच्या काही खाणाखुणा सापडल्या नाहीत. यामुळे स्थानिकांना दिसलेला बिबटय़ा नेमका गेला कोठे, असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

पंचवटीतील तारवालानगर ते मेरी कॉर्नर परिसरात रविवारी दुपारी एका वाहनधारकाला बिबटय़ा दिसल्याचे सांगितले जाते. हा बिबटय़ा या भागातील शाळेच्या दिशेने गेल्याची माहिती संबंधिताकडून दिली गेली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने संपूर्ण परिसर रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळपर्यंत पाच ते सहा वेळा पिंजून काढला. सतर्कता म्हणून रात्रीदेखील दोन कर्मचारी गस्तीसाठी नेमण्यात आले. मात्र या शोधमोहिमेत ना बिबटय़ा आढळला, ना त्याच्याशी संबंधित काही पाऊलखुणा. दरम्यानच्या काळात सोमवारी या परिसरातील शाळा होणार नसल्याचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले. शाळा व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी शाळा बंद ठेवणे पसंत केले.

या संदर्भात वनक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी माहिती दिली. प्रत्यक्षदर्शी व आमचे आतापर्यंत बोलणे झाले नाही. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सहा वेळा परिसराची पाहणी केली.

[jwplayer jhW4ODCD]

परंतु, बिबटय़ा दिसलेला नाही. बिबटय़ा दिसला ही अफवाही म्हणता येणार नाही. कारण काही स्थानिक तो दिसल्याचे सांगत आहेत. यामुळे सोमवारीही परिसरात शोधमोहीम राबविली गेल्याचे ते म्हणाले. निसर्गनियमानुसार बिबटय़ा रात्रीतून २० ते २५ किलोमीटर पार करू शकतो. बिबटय़ा असलाच तर तो मेरी परिसर सोडून नदी किनाऱ्याने हनुमानवाडी अथवा त्यापुढील भागाकडे निघून गेला असण्याची शक्यता आहे.

याच परिसरात मेरीचा विस्तीर्ण परिसर आहे. त्या ठिकाणी मोरांचे वास्तव्य आहे. हे ठिकाणही बिबटय़ाला मानवणारे ठरू शकते. या एकंदर स्थितीत प्रत्यक्षदर्शीने पाहिलेला बिबटय़ा होता की नाही इथपासून तो बिबटय़ा असलाच तर नेमका गेला कुठे असे प्रश्न सर्वाना पडले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police with forest department in search of leopard

ताज्या बातम्या