नाशिक : पावसाने अवघे शहर खड्डेमय झाल्याची स्थिती असून काही महिने आणि वर्षांपूर्वी तयार झालेल्या नव्या रस्त्यांचीदेखील अक्षरश: वाट लागली आहे. काही रस्त्यांवर खड्डे इतके मोठे आहेत की वाहनांची चाके अडकून अपघात होऊ शकतात. बहुतांश रस्त्यांवरील वरचा थर वाहून गेला. रस्त्याच्या धोकादायक बनलेल्या किनारी अपघातांना निमंत्रण देणाऱ्या आहेत. शहरातील रस्त्यांची वाताहत झाली असताना राजकीय पातळीवरील मौन बरेच बोलके आहे. काही अपवाद वगळता कुणी या मुद्दय़ावर बोलण्यास तयार नाही. या स्थितीत माजी महापौर दशरथ पाटील यांनी आठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देण्याचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी चकचकीत दिसणाऱ्या रस्त्यांचे रूप पावसाने पालटले आहे. मुख्य रस्त्यांसह कॉलनीतील लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून त्यात डबके तयार होते. वाहनधारकांना अंदाज येत नाही. रस्त्याच्या किनारी, डांबर, मुरूम निघून गेल्याने विचित्र बनल्या आहेत. ही स्थिती शहरवासीयांना अडचणीच्या भोवऱ्यात लोटणारी आहे. शहरातील अनेक रस्ते अपघातप्रवण क्षेत्र बनली आहेत. भाजपच्या सत्ताकाळात कोटय़वधींच्या रस्त्यांची कामे मार्गी लागल्याचे दावे केले गेले होते. त्या नव्या रस्त्यांचा दर्जा या निमित्ताने उघड झाला आहे. शिवाय, मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाची कार्यशैली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एरवी कुठल्याही विषयावरून राजकीय पक्ष मैदानात उतरतात. निवडणुकीचा हंगाम तोंडावर असूनही मनपातील सत्ताधारी वा विरोधी पक्षांनी खड्डेमय रस्त्यांविषयी सोयीस्कर मौन बाळगले आहे. काहींचा त्यास अपवाद म्हणता येईल.

ठेकेदारांना नोटीस देण्यास विलंब का?
तीन, पाच वर्षे रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदारांना तोंडी आदेशाऐवजी लेखी कायदेशीर नोटीस का दिली गेली नाही, असा प्रश्न माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आठ दिवसांत रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात ठाण मांडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ज्या ठेकेदारांवर रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी होती, त्यांची अनामत रक्कम परत देण्यास स्थगिती द्यावी. संबंधितांची ती रक्कम परत दिली असल्यास संबंधितांवर मेहरबानी दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. रस्ते मुरूम आणि पेव्हर ब्लॉकने भरता कामा नये. विशिष्ट मिश्रणाने ठेकेदारांकडून ते भरून घ्यावेत. पावसाळय़ात दूषित पाण्याने आजार पसरण्याची शक्यता आहे. मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात तुरटीचा वापर केला जातो की नाही, याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा वास येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात किती तुरटी वापरली गेली की तिची केवळ कागदावर खरेदी झाली, याचा पालिका आयुक्तांनी शोध घ्यावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर
गेल्या सात वर्षांपूर्वी किंवा त्याआधी बांधलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ही दुरुस्ती खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, जीएसबी साहित्याने तात्पुरत्या स्वरूपात केली जात आहे. सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात आहे. दोष निवारण कालावधीत ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, अशा ठेकेदारांना नोटिसा बजावून त्वरित रस्ते दुरुस्तीची ताकीद देण्यात आली. त्या अनुषंगाने कार्यवाही न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला गेल्याचे महापालिकेने म्हटले आहे.