नंदुरबार : नंदुरबार मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांची शनिवारी नंदुरबार येथे सभा झाली. प्रियंका यांनी गांधी परिवार आणि नंदुरबार यांचे नाते असल्याचे सांगत मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. सभा संपल्यानंतर प्रियंका या आपल्या वाहनात बसतील आणि रवाना होतील, अशी सर्वांची अपेक्षा असताना त्यांनी असे काही केले की सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली.

नंदुरबारच्या सभेत प्रियंका गांधी यांनी, आपल्या आजी इंदिरा गांधी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कायम नंदुरबारमधून करीत असत, याची आठवण उपस्थितांना करुन दिली. सोनिया गांधीही इंदिरांपासूनच आदिवासींचा आदर करणे शिकल्या. पेसा आणि पंचायत राज कायदा काँग्रेसने लागू केला. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांनी वनहक्क कायदा आणला. आपल्याला समजून घेण्यासाठी, आपल्यात येण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढल्याचे प्रियंका यांनी सांगितले.

हेही वाचा…राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

संधी मिळेल तिथे भाजप आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. मणिपूर आणि मध्य प्रदेशातील घटनांचा उल्लेख करुन आदिवासींवर अत्याचार झाल्याच्या घटनाप्रसंगी पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ गप्प राहिले, अशी टीका प्रियंका यांनी केली. आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते संसद भवनाचे उदघाटन का केले नाही, राममंदिराचे उदघाटन त्यांच्या हस्ते का केले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मोदी आदिवासी सन्मानाची भाषा करतात. परंतु, बोलतात काय आणि करतात काय, अशी त्यांची स्थिती आहे. या सरकारला आपण हाकलून लावत नाहीत, तोपर्यंत आपण बोलणारच, असे प्रियंका यांनी सांगितले.

हेही वाचा…नाशिक : वादळी पावसाने घरे, कांदा चाळीचे नुकसान; झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत

सभा आटोपल्यानतंर प्रियंका मंचावरुन खाली उतरुन सभेसाठी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सामील झाल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. नंतर, गाडीबाहेर निघत कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यकर्ते आणि उपस्थितांकडून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत होता. प्रत्येक जण त्यांच्याशी हस्तांदोलनासाठी पुढे येत होता. यामुळे सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.