राज्यघटनाविरोधी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शहर परिसरातील पुरोगामी संघटना आणि लोकशाही हक्क संरक्षण समितीच्यावतीने बुधवारी शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याच्या घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. अॅड. पानसरे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पािठबा असल्याचे सनातनकडून सांगण्यात येत आहे. आपण समीर सोबत असून पोलिसांना कठोर शासन करू, असे म्हणत आहे. सतानत संस्थेचे हे वक्तव्य राज्य घटनेच्या विरोधी असून पोलिसांवर दबाव आणण्याचा तो प्रयत्न असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. अॅड. पानसरे यांच्या खून्यातील संशयिताचे वकिलपत्र कोल्हापूर वकील संघाने न घेण्याचा निर्णय घेऊन खरी आदरांजली विवेकवादी नेत्याला दिली आहे. डॉ. दाभोलकर आणि प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी अजून मोकाट फिरत आहे. धर्माच्या नावाखाली तरूणांना फसविणाऱ्या संघटनांपासून विद्यार्थी व समाजाने सावध रहावे, लोकशाहीने बहाल केलेले हक्क अबाधित राहिले पाहिजे आदी मागण्या समितीने केल्या. आंदोलनात राजू देसले, श्रीधर देशपांडे, संदीप भावसार, प्रा. डॉ. मिलींद वाघ, सचिन मालेगावकर आदी सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2015 रोजी प्रकाशित
सनातन संस्थेविरोधात पुरोगामी संघटनांचे आंदोलन
राज्यघटनाविरोधी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी,
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 24-09-2015 at 02:05 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Progressive organizations agitation against sanatan sanstha