नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असावी, यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हरितकुंभ संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत नदीपात्रात कचरा टाकणे, प्लास्टिक पिशव्या टाकणे, कपडे, भांडे वा वाहने धुण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.
शहरातून वाहणाऱ्या गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. गोदावरी नदी दूषित करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाते. गोदावरी प्रदूषित केल्याच्या कारणावरून सहा महिन्यांत ८८ गुन्हय़ांची नोंद करण्यात आल्याची बाब अलीकडेच गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठकीत उघड झाली होती. गोदावरीच्या प्रदूषणास हातभार लावणाऱ्यांविरुद्ध पाच वर्षांत तीन हजार ८५६ गुन्हे दाखल करण्यात आले. हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. परंतु तरीदेखील भाविक, नागरिकांकडून गोदापात्रात निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या तसेच तत्सम वस्तू टाकल्या जातात. शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. या नदीपात्रात कपडे, भांडी, मोटार वाहन धुणे, जनावरे धुणे तसेच नदीपात्रात कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे अथवा गोदावरी प्रदूषित होईल अशी कृत्ये केली जातात. त्यास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील, शहर पोलिसांनी म्हटले आहे.