निफाड येथे वन उद्यान, मानव-बिबट्या सहजीवन केंद्राचे उद्घाटन

नाशिक : जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला असून निफाड तालुक्यात वन विभागाने देशात आदर्श ठरेल असे वनउद्यान तयार केले आहे. या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याची भावना वन उदयान व मानव-बिबट्या सहजीवन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त झाली.याचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते तर आमदार दिलीप बनकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपवनसंरक्षक पंकज गर्ग व तुषार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत असून परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. भविष्यात हा संघर्ष रोखण्यासाठी मानवाला वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागणार आहे. वन पर्यटनास चालना मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. शालेय जीवनापासून वन उद्यानाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे धडे देऊन वन्यजीव व प्राण्यांबद्दल सहानुभूती व संरक्षणाची भावना निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

आमदार बनकर यांनी वन उद्यान भावी पिढीसाठी माहितीपूर्ण आकर्षणाचा बिंदू ठरेल असे

नमूद केले. कार्यक्रमात वन विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

वन उद्यानात काय आहे

एक हेक्टर क्षेत्रात उभारलेल्या या वन उद्यानात प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आला आहे. मुलांच्या बगीच्यात विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे.