रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे चौकशी करावी, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह आंबेडकरवादी विचार मंचने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने मूक मोर्चा काढून उपरोक्त घटनेचा निषेध करण्यात आला.
सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याची वेळ रोहितवर आल्याचे आंबेडकरवादी विचार मंच आणि समता परिषदेने म्हटले आहे. रोहितसह इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन, सरकारमधील काही मंत्री, हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत जातीय द्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतिगृह, ग्रंथालयासह अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. जातीयवादी शक्ती दलित आदिवासी इतर मागासवर्गीय समाजाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व घटनादत्त अधिकारावर गदा आणून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. वेमुला प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी समता परिषदेने निवेदनाद्वारे केली. तसेच या घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी तसेच हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव यांना त्वरित पदावरून हटवावे, अशी मागणी करण्यात आली. दलितांना भेडसावणारे प्रश्न सोडविणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशी अपेक्षा विचार मंचचे स्वप्निल गायकवाड यांनी व्यक्त केली. रोहितच्या आत्महत्येच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामीण भागातही आंदोलने होत आहेत.