पोलीस भरती निकषांमध्ये बदल करावेत, या मागणीसाठी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन युवा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीत उमेदवारांवर अन्यायकारक निकष लादल्याची तक्रार मोर्चेकऱ्यांनी केली. या बदलांचा संघटनेने निषेध केला आहे. २००८ मध्ये मंजूर ६५००० पदांपैकी २४००० पदे अद्याप रिक्त आहेत. तसेच जाहिरातीतील ५० टक्के पदांबरोबर शिल्लक ४००० आणखी पदांचा त्वरित समावेश करावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासनाने भरती प्रक्रियेत २०११ प्रमाणे निकष कायम ठेवावेत, असा संघटनेचा आग्रह आहे.

त्यात पुरुषांसाठी १६०० मीटर धावण्यासाठी ४.५० सेकंद ही वेळ बदलून सहा मिनिटे व महिलांसाठी ८०० मीटर धावणे २.४० मिनिटांऐवजी चार मिनिटे करण्यात यावी, खुला वर्ग भरतीसाठी वयाची अट २८ वर्षे करण्याची आणि २० हजार जागांवर भरती करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे. भरतीच्या वेळी जेवण, पाणी, राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

मागासवर्गीयांसाठी राखीव जागा वाढविण्यात याव्यात, भरतीसाठी आकारण्यात आलेले शुल्क ३२० आणि राखीव जागेसाठी असलेले १७० रुपये शुल्क रद्द करावे, पुढील काळात बेरोजगारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, २०१५ च्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन ५० हजार पदांना त्वरित मंजुरी द्यावी, रिक्त पदेदेखील त्वरित भरावीत, भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व निष्पक्षपातीपणे राबवावी, पोलीस भरतीत महिलांना उंचीमध्ये सवलत देण्यात यावी, भरती करताना खुल्या, ओबीसी, एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी. सर्व गटांसाठी करावी, या मुद्दय़ांकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले.

ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या उमेदवारांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यावरही तोडगा काढणे गरजेचे असल्याचे प्रकाश देसले, कमलाकर शिंदे, अ‍ॅड्. राजपाल शिंदे, योगेश गांगुर्डे आदींनी म्हटले आहे.