ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर साशंकता
न्यायालयाने प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली असताना दिंडोरी तालुक्यातील मोहाडी शिवारात त्याचे सर्रासपणे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. गायरान जमिनीवर ही शर्यत झाल्याचे सांगितले जाते. पोलीस दप्तरी त्याची नोंद बेकायदेशीरपणे प्राण्यांच्या शर्यतीचे आयोजन केल्याची असून त्या अनुषंगाने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणेच्या भूमिकेबद्दल स्थानिकांमधून साशंकता व्यक्त होत आहे.
मोहाडी शिवारात सालाबादप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जनावरांची शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक यात्रेत गर्दी करतात. न्यायालयाने प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली आहे. या पाश्र्वभूमीवर शर्यत होईल की नाही, याकडे सर्वाचे लक्ष होते. परंतु यात्रेत ७०-८० बैलजोडय़ा शर्यतीत उतरल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून ेसांगितले. कॅमेरा व भ्रमणध्वनीवर छायाचित्र टिपण्याचा उपस्थितांनीा मज्जाव केला. पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद झाली असली तरी शर्यत झाल्याची बाब यंत्रणाही नाकारत आहे.
पोलीस यात्रेत पोहोचण्याआधीच आयोजक वाहनासह फरार होते. प्रत्यक्षदर्शीकडून गाडय़ांचे क्रमांक मिळवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शर्यतीसाठी घोडे, बैल यांना वाहनात करकचून बांधण्यात आले होते. सरावासाठी निर्दयतेने वागणूक दिली जात असल्याने पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र शर्यत न झाल्याने केवळ निर्दय वागणूक या कलमाखाली गुन्हा दाखल असून त्यात आयोजकांकडे कानाडोळा केला गेल्याचे दिसून येते.
या प्रकरणी तीन वाहनचालकांसह उत्तमराव शिवराम मोजाड, सुनील निकम, कैलास जोपाळे (रा. मोहाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र संशयित वाहनासह फरार असून पोलीस संशयित व त्यांच्या वाहनांचा शोध घेत आहेत.