वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित
जिल्ह्यतील मालेगाव व नांदगाव तालुक्यासह परिसरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात काही भागात २० ते २५ मिनिटे पाऊस झाला. वादळामुळे अनेक ठिकाणच्या तारा तुटल्याने मालेगाव शहराचा वीज पुरवठा खंडित झाला.
पावसाचे नेहमीपेक्षा काही दिवस आधीच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचे प्रत्यंतर आठवडाभरापासून वळवाच्या पावसाने येत असून तो शेतीसाठी नुकसानकारक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यात वादळी पावसाने कांदा चाळी जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी झाली.वाऱ्यामुळे अनेक भागातील वाहिन्या तुटल्याने शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज नसल्याने दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम झाला.
नागरिकांना दिलासा
मागील काही दिवसांपासून मालेगावचा पारा ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. कमालीच्या उष्म्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. सकाळपासून मालेगावसह आसपासच्या भागात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी साडे तीन वाजेनंतर सोसाटय़ाचा वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे पाऊस झाला. पावसाने वातावरणात बदल झाले. उकाडा कमी होऊन गारवा जाणवू लागला. नांदगाव व आसपासच्या भागातही पावसाने हजेरी लावली. येवला, मनमाड व चांदवडसह आसपासच्या भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात सरी बरसल्या तर काही भागात त्याने हुलकावणी दिली. जिल्ह्यातील इतर भागातही ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला.