शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून खासदार राजू शेट्टी यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली असून त्यांच्या आत्महत्या हे राज्य सरकारचे पाप आहे, असा आरोप त्यांनी नाशिकमधील मेळाव्यात केला.

शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. १०० रुपये खर्च करुन तो ६० रुपये कमावतो. त्यामुळे त्याची अवस्था दयनीय झाली आहे. योग्य हमीभाव मिळत नाही म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कर्जमाफीची मागणी होत आहे, असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून अभ्यासच करत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही, तर २०१९ दूर नाही, असा इशारा देत शेतकरी सरकारला हद्दपार करतील, अशी भविष्यवाणी शेट्टी यांनी केली. वाल्याला वाल्मिकी करणार असं सरकार म्हणतं, पण महाराष्ट्राला या वाल्मिकीची गरज नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या प्रस्तावित समृद्धी महामार्गालाही विरोध दर्शवला. अगोदर शेतकऱ्यांना समृद्ध करा, मग समृद्धीमार्गाचा विचार करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. स्मार्ट सिटी उभ्यारण्यासाठी शेतकऱ्यांची जमीनच तुम्हाला सापडली का? असा सवालही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी भाजप विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या शेट्टी यांनी राज्यातील कर्जबुडव्या उद्योजकांचा दाखला दिला. शेट्टी म्हणाले की, ‘राज्यातील उद्योजकांनी १ लाख ७६ हजार रुपयांचे कर्ज बुडवले. मग राज्यातील शेतकऱ्यांना पैसे देताना लकवा का येतो?’
कर्जमुक्ती हा शाश्वत उपाय नसून ती शेतकऱ्यांसाठी सलाईन आहे. यावर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतीमध्ये फायदा होतोय हे सिद्ध करावे, मगच शेतकऱ्यांवर प्राप्तिकर आकारण्यात यावा, असे ते म्हणाले. सरकारच्या अपयशी धोरणामुळे राज्याचं २ लाख ९३ कोटी नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.