ऋतुमानानुसार येणाऱ्या वेगवेगळ्या सणोत्सवाशी स्त्रीचं भावविश्व तिच्याही नकळत जोडले जाते. तिचं भावविश्व जपताना आपला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सांभाळत प्रत्येक उत्सव वेगळेपणाने साजरा करणाऱ्या येवलावासीयांनी यंदाही दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भाऊबीजेच्या दिवशी येथील धडपड मंचच्या वतीने प्रभाकर झळके यांच्या पुढाकाराने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही स्पर्धा स्थळाची निवड न करता स्पर्धकाच्या अंगणात जाऊन दारापुढे स्पर्धकाने रेखाटलेल्या रांगोळीतून विजेत्याची निवड करायची. स्पर्धेस महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दीपोत्सव म्हटले की फराळ, फटाक्यांची आतषबाजी. मात्र त्यात बदल करत येवलावासीयांनी १८ वर्षांपासून धडपड युवा मंचच्या माध्यमातून दीपोत्सव म्हणजे ‘रांगोळी उत्सव’ हा पायंडा पाडला आहे. दिवाळी आली की महिलांना रांगोळी काढण्याचे वेध लागतात. या उत्सवात सहभागी होण्यासाठी आठ दिवस आधीपासून दारापुढील अंगण सिमेंटने तयार करून शेणाने सारवूण तयार करणे अशी तयारी स्पर्धकांनी सुरु केली होती. विविध रंगांच्या रांगोळ्यातून उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती व्हावी, यासाठी स्पर्धेच्या दिवशी आठ ते नऊ तासापर्यंत महिला वर्ग एकाग्रतेने रांगोळी काढण्यात कार्यमग्न झाल्या होत्या. स्पर्धा पारंपरिक टिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती आणि विषयाचे बंधन नसलेली रांगोळी या तीन कला प्रकारात विभागली गेली. एकूण २०३ स्पर्धकांनी सहभाग घेत नानाविध रांगोळी साकारल्या. पाने-फुले, धार्मिक प्रसंग, पशु-पक्षी, व्यक्तीचित्रे, निसर्ग चित्रे, गालिचा, पैठणीचा पदर, बेटी बचाव, क्रांतीकारक, थ्रीडी अशा विविध विषयांवरील रेखाटलेल्या रांगोळ्या पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली.  रात्री एक वाजेपर्यंत कलाप्रेमी येवलेकर, बाहेरगावहुन आलेल्या पाहुणे मंडळीसह शहरातील गल्लीबोळात, नववसाहतीत फिरताना दिसत होती. रांगोळ्यांचे सौदर्य खुलविण्यासाठी काही ठिकाणी आकर्षक रोषणाई केली गेली तर काही ठिकाणी मंजुळ सुरात ध्वनीफीत लावण्यात आल्याने स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. महोत्सवात महिला आणि युवतींनी आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर काढलेल्या अप्रतिम रांगोळ्यांनी शहराचे सौंदर्य खुलविले. काही तरुणांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले हे विशेष. इतक्या अप्रतिम रांगोळ्या आणि त्यावर घेतलेली मेहनत लक्षात आल्यावर परीक्षकांची चांगलीच कसरत झाली.  विभागनिहाय गटातून विजयी स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात विषयाचे बंधन नसलेल्या गटात अमृता गुजराथी, आदिती पटेल, स्नेहल कोळस, तसेच संस्कार भारती गटात गुजराथी ग्रुप, जागृती विधाते, मयूरी माडीवाले, माया टोणपे तर पारंपरिक ठिपके रांगोळी गटात रेखा लाड, प्रीती पहिलवान, सोनाली कंदलकर, गायत्री परदेशी यांनी यश संपादन केले. परीक्षक म्हणून शैला कलंत्री, संध्या तोडकर, सुशांत घोडके यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीततेसाठी संतोष खंदारे, मंगेश रहाणे, मुकेश लचके, श्रीकांत खंदारे, मयूर पारवे, दत्ता कोटमे आदींनी परिश्रम घेतले.