जळगाव – रक्षाबंधनापूर्वी दोन हजार रूपयांवर असलेले केळीचे दर आता १२०० रूपयांपर्यंत घसरले आहेत. शेतकऱ्यांना क्विंटलमागे तब्बल ८०० रूपयांनी तोटा सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, केळीसाठी प्रसिद्ध रावेर बाजार समितीची ऑगस्टमधील एकूण उलाढाल सुमारे ५० कोटी रूपयांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असून, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज दर जाहीर करतात. तरी देखील स्थानिक व्यापारी वर्ग केवळ मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांना प्रमाण मानतो. इतकेच नव्हे तर देशभरातील व्यापारी देखील बऱ्हाणपूरच्या भावावर लक्ष केंद्रित करून व्यवहार करतात. परिणामी बऱ्हाणपूरमध्ये केळी भावात किंचित चढ-उतार झाला, तरी त्याचे परिणाम थेट राष्ट्रीय स्तरावर जाणवतात. याच परिस्थितीचा फायदा घेत बऱ्हाणपूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड होत असल्याचे नेहमीच दिसून येते. दर मनमानी पद्धतीने कधी वाढवले जातात तर कधी अचानक घटवले जातात. या अनियमित व्यवहारामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाहीत आणि त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
बऱ्हाणपूर बाजार समिती प्रमाणे रावेर बाजार समितीकडूनही दररोज केळी भाव जाहीर केले जातात. अर्थात, रावेरमध्ये बऱ्हाणपूरच्या तुलनेत वास्तववादी म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून भाव जाहीर केले जातात. सध्या देखील बऱ्हाणपूरात केळीला ६०० ते १२०० रूपयांचा भाव आहे, तर रावेरमध्ये ११५० ते १३५० रूपयांचा बोर्ड भाव आहे. प्रत्यक्षात व्यापारी रावेर बाजार समितीने जाहीर केलेले बोर्ड भाव मानताना दिसलेले नाही. बऱ्हाणपुरात जो भाव जाहीर होईल तोच भाव तुम्हाला मिळेल, असे व्यापारी शेतकऱ्यांना ठणकावून सांगत आहेत. बऱ्हाणपूर बाजार समितीचा सगळीकडे बोलबाला झाल्याने रावेर बाजार समितीच्या बोर्ड भावाला अलिकडे फार महत्व राहिलेले नाही. त्याचा विपरीत परिणाम रावेर बाजार समितीच्या एकूण आर्थिक उलाढालीवर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ऑगस्टमध्ये सर्वात कमी उलाढाल
दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अर्थसंकल्प व सांख्यिकी संचालनालयाच्या सहकार्याने रावेरमधून होणाऱ्या केळी व्यापाराचा नुकताच सखोल अभ्यास केला. त्यानुसार, रावेरमध्ये २०२३–२०२५ कालावधीत तब्बल ९६ हजार १२३ ट्रक (प्रत्येकी १०० क्विंटल) केळीची आवक झाली. आणि खरेदी-विक्रीतून सुमारे १८०० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली. बाजार समितीत मे २०२४ मध्ये सर्वात कमी सरासरी १३७१ प्रति क्विंटलप्रमाणे भाव आणि जुलै २०२५ मध्ये सर्वात जास्त सरासरी २३५३ प्रति क्विंटलप्रमाणे केळी भाव शेतकऱ्यांना मिळाला. मे-जुलै २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४५२ कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली असताना, ऑगस्टमध्ये मात्र केळीचे दर घसरल्याने रावेर बाजार समितीत केवळ १०० कोटींची उलाढाल झाली.
रावेर बाजार समितीच्या अभ्यासानुसार केळी पुरवठा व किंमत यांच्यातील सहसंबंध -०.२२५ इतका कमकुवत आणि नकारात्मक आहे. थोडा पुरवठा वाढला तरी केळीचे भाव घसरतात. जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करून जळगावच्या केळीला अधिकाधिक चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. –आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)