मुलांना शाळाबाह्य़ करण्यास कारक घटक

बालकांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळावा, शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण विभाग विविध माध्यमातून प्रयत्नशील असला तरी कौटुंबिक अनास्थेची झळ बालकांना सहन करावी लागत आहे. जिल्ह्य़ात शेतीसाठीच्या विशिष्ट हंगामात एक हजार विद्यार्थी शाळा बाह्य़ होतात. त्यानंतर पुन्हा शाळेत येतात. काही वेळा घरातील लहान भावंडांना सांभाळायचे म्हणून, तर कधी मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बंद पडते. हे धक्कादायक वास्तव सर्व शिक्षा अभियानाच्या ‘मीना राजू मंच’च्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.

सर्व शिक्षा अभियान तळागाळातील बालकांसह समाजातील सर्व स्तरातील सहा ते १४ वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करतांना विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला महत्त्व देत त्यांच्याशी मुक्त संवाद साधण्याचे प्रयत्न होत आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘मीना राजू’ मंचची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मंच काम करीत आहे. या मंचच्या माध्यमातून मुला-मुलींना आरोग्य शिक्षण, काही कौशल्यात्मक पूरक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

जी मुले शाळेत सातत्याने गैरहजर राहतात, अशा मुलांसाठी मंचचे सदस्य म्हणजे विद्यार्थी काम करतात. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या मुला-मुलींच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्या गैरहजेरीची कारणे समजून घेतात. जिल्ह्य़ाचा विचार केल्यास शेतीच्या कामांची लगबग सुरू झाल्यानंतर एक हजारहून अधिक मुले दरवर्षी काही महिने सलग गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले. घरातील कौटुंबिक अडचणी, पालकांची आर्थिक विवंचना तसेच अनास्था यासाठी कारणीभूत आहे.

आर्थिक विवंचनेमुळे बऱ्याचदा घरात वाद होत असल्याने मुलांना शाळेत पाठविले जात नाही. शेतीच्या कामांसाठी त्यांना जावे लागते. मुलींना घरीच राहून आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करावा लागतो. काही वेळा उपजीविकेच्या शोधात पालक दुसऱ्या जिल्ह्य़ात किंवा दुसऱ्या गावात जात असल्याने मुला-मुलींना सुरक्षिततेसाठी आपल्या सोबत घेऊन जातात. काही ठिकाणी मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यावर पालक शाळेस पाठविण्यास नाखूश असल्याचे चित्र जिल्ह्य़ात आहे.