घटनांत लाखोंचा ऐवज लंपास; चोर मोकाट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील विविध भागांत चोरटय़ांकडून दुचाकी चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरू आहे. या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला असून अद्याप या प्रकरणी कोणाला अटक झालेली नाही.

हिरावाडी परिसरातील कुंजविहार सोसायटीत सविता जोशी राहतात. काही कामानिमित्त त्या घराला कुलूप लावत बाहेर पडल्या. त्या वेळी चोरटय़ांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडत घरातून ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यामध्ये काही रोख रक्कम व सॅमसंग टीव्ही, तीन भरलेले सिलिंडर, एक मनगटी घडय़ाळ यांचा समावेश आहे.

दुसरी घटना पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात घडली. दिल्ली येथील रहिवासी सोनाली चौधरी काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्या. त्या वेळी त्यांच्या पर्समधील काही रोख रक्कम, डेबिट व क्रेडिट कार्ड असा १५ हजारांचा ऐवज चोरटय़ाने लंपास केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोडच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भागात संशयित अक्षय सोनवणे (२२, रा. नाशिकरोड) व हेमंत वाघ (२४, रा. नाशिकरोड) यांनी विद्युत केंद्राच्या नियंत्रण कक्षात प्रवेश करत तीन हजार रुपये किमतीच्या ब्रेकर मशीनच्या पट्टय़ा चोरून नेल्या.

त्यांच्या विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उंटवाडीच्या कालिकानगर येथे घरात प्रवेश करत संशयित रिचा पवार हिने ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरल्याची तक्रार डॉ. शीतल पाटील यांनी दिली आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ध्रुवनगर येथील जय गणेश अ‍ॅव्हेन्यू सोसायटीत रवींद्र सानप राहतात. त्यांनी घराजवळ आपली दुचाकी लावली होती. रात्री उशिरा चोरटय़ांनी ती पळवून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी तांबट लेन येथे राहणारे जयवंत सोनवणे यांनी कामानिमित्त आपली अ‍ॅक्टिव्हा दादासाहेब गायकवाड सभागृहालगत लावली होती. कोणीतरी ती चोरून नेली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery incident continued in nashik
First published on: 28-12-2016 at 01:36 IST