|| चारुशीला कुलकर्णी
धावत्या रुग्णवाहिकेत ७०० पेक्षा अधिक महिलांची प्रसुती :- आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला जिल्ह्य़ात काही अपवाद वगळता उत्तम प्रतिसाद लाभत आहे. चार वर्षांत या सेवेचा एक लाखाहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यात गरोदर माता, नवमातांचे प्रमाण लक्षणीय असून ७०० पेक्षा अधिक नवजात बालकांचा जन्म धावत्या रुग्णवाहिकेत झाला आहे. दुसरीकडे, या सेवेविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ग्रामीण विशेषत आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सेवा, सुविधा जलद पोहचाव्यात या उद्देशाने १०८ रुग्णवाहिकेची संकल्पना मांडण्यात आली. या सेवेसाठी जिल्ह्य़ात ४६ रुग्णवाहिका कार्यरत असून ९० वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेची धुरा सांभाळत आहेत. दूरध्वनीवर रुग्ण किंवा नातेवाईकांकडून विचारणा झाली, की अवघ्या २० मिनिटांत ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहचते असा दावा आरोग्य विभाग करत आहे. रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्यानंतर तत्काळ जवळचे रुग्णालय गाठून त्या महिलेला पुढील वैद्यकीय सेवा देण्यात येते. तसेच वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ‘न्युट्रल ट्रान्सफर’मध्ये राज्यात नाशिक आघाडीवर असून १० हजारांहून अधिक बालकांना या सेवेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय सेवा जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.
मागील महिन्यात एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. १०८ रुग्णवाहिकेला या संदर्भात माहिती देताना महिलेला जुळे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यासह रुग्णवाहिका महिलेच्या घरापर्यंत पोहचल्यानंतर महिलेला कळांचा त्रास असह्य़ झाला. तातडीने दवाखाना गाठता यावा यासाठी रुग्णवाहिका पुढे जात असताना घर सोडल्याबरोबर अवघ्या दोन किलोमीटरवर महिलेने एका चिमुकलीला जन्म दिला. प्रसूतीसाठी होणारा विलंब आणि मातेची, बाळाची सुरक्षा लक्षात घेऊन रुग्णवाहिकेतच शस्त्रक्रियेद्वारे दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. महिलेवर तिच्या दोन चिमुकल्यांसह प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉ. अश्विन यांनी सांगितले.
दुसरीकडे, आरोग्य विभागाचे दावे फोल असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली. १०८ ची रुग्णवाहिका ही जिल्ह्य़ात सर्वत्र धावत असली तरी ती प्रत्यक्ष महामार्ग, मुख्य रस्त्यालगत असलेल्या गावातच पोहचत आहे. बऱ्याचदा १०८ वर संपर्क साधला असता वाहन एक तास विलंबाने गावात पोहचते. त्यानंतर पुन्हा रुग्णालय गाठण्यासाठी होणारा कालपव्यय, यामुळे रुग्णावर उपचार सुरू होण्यास विलंब होत असल्याकडे मधे यांनी लक्ष वेधले. आशा सेविकांनीही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुर्गम भागातील प्रश्न कायम
१०८ ची आरोग्य सेवा जननी सुरक्षा, जननी-शिशू सुरक्षासह अन्य योजनांसाठी उपयुक्त ठरते. सेवेत लाभ घेण्यात गरोदर माता, नवजात मातांचे प्रमाण ६२ हजाराहून अधिक आहे. हा आकडा लक्षवेधी असला तरी प्रत्यक्षात सेवा मिळवण्यात दुर्गम भागात अडचणी येतात. या रुग्णवाहिकांची काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणाहून विनाविलंब सेवा मिळते. बऱ्याचदा आदिवासी भागात संपर्क, रस्ता खराब किंवा गावात पोहोचायला रस्ताच नाही, अशी स्थिती असल्याने पुढील गावापर्यंत डोली करून किंवा खासगी वाहन करत जावे लागते. यासाठी होणारी पदरमोड, शारीरिक श्रम परवडण्यासारखे नाही.