रुग्णालयांनाही प्राणवायू मिळेना; महापालिका १०० ‘ऑक्सिजन कॉन्सन्टे्रटर’ घेणार

नाशिक : रेमडेसिविरच्या खरेदीसाठी औषध दुकानांसमोर रांगा लागल्या असताना वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्राणवायूयुक्त खाटा मिळविण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. महापालिकेसह बहुतांश खासगी रुग्णालयांत प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा शिल्लक नाहीत. रुग्णालयांना प्राणवायूची टंचाई भासत आहे. प्राणवायूयुक्त खाटांची तातडीने व्यवस्था करणेही अवघड ठरते. त्यामुळे महापालिकेने हवेतील प्राणवायू रुग्णास देणारी १०० यंत्रे अर्थात ‘ऑक्सिजन कॉन्सन्टे्रटर’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात दररोज साडेचार ते पाच हजार नवीन रुग्ण आढळत असून यातील ६५ ते ७० टक्के रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. दैनंदिन जितक्या तपासण्या होतात, त्यातील ४०.३० टक्के नमुने सकारात्मक येतात. सक्रिय रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरात सध्या २० हजारांच्या आसपास रुग्ण असून १०, ५२७ रुग्ण हे ग्रामीण भागातील, मालेगाव शहरात २१३४ आणि २५१ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. सक्रिय रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना जरी प्राणवायूची निकड भासली तरी तेवढ्या प्राणवायूयुक्त खाटा नसल्याची बाब सध्याच्या घटनाक्रमावरून उघड होत आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायूयुक्त खाटा कितीही प्रयत्न केले तरी मिळत नाहीत. कुठे एखादी खाट मिळेल, या आशेने नातेवाईक महापालिकेच्या व्यवस्थेसह अनेक रुग्णालयांत प्रत्यक्ष तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करीत आहेत. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये बुधवारी प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा मिळत नसल्याची बाब महापालिकेच्या करोना कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. प्राणवायूची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिविरप्रमाणे प्राणवायूची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक खासगी रुग्णालये प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करीत आहेत.

पालिकेच्या मध्यवर्ती खाट आरक्षण प्रणालीतील माहितीनुसार शहरात एकूण ११९ रुग्णालयांतील ४५६५ खाटा करोनासाठी आरक्षित आहेत. त्यातील १९९९ प्राणवायूयुक्त खाटा असून त्यात बुधवारी दुपारी १००१ खाटा रिक्त असल्याचे दर्शविले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा अधिक संभ्रम होत आहे. या व्यवस्थेत खाटा रिक्त असल्याचे दिसते. प्रत्यक्षात मात्र त्या खाटा रिक्त नसतात. रुग्णालयांकडून माहिती अद्ययावत केली जात नसल्याने रुग्णासह नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्राणवायू पुरवठा नियोजनाचे गणित चुकले

अन्न आणि औषध प्रशासनाने प्राणवायूचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी मध्यंतरी वितरक आणि रुग्णालयांना करारनामा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार किती रुग्णालयांनी करारनामे केले याची स्पष्टता झालेली नाही. अलिकडेच अन्न, औषध प्रशासनाने रुग्णांच्या संख्येनुसार जिल्ह्याची कमाल गरज ५६ मेट्रिक टन असल्याचे म्हटले होते. जिल्ह्याातील १० उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांना ८०.९१ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. नियमित वितरण केल्यानंतर २८.४४ मेट्रिक टन प्राणवायू अतिरिक्त ठरत होता. आता मात्र प्राणवायूची टंचाई भासत असून अनेक रुग्णालयांना तो पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या संदर्भात अन्न औषध प्रशासनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करूनही प्रतिसाद मिळाला नाही. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर शहर, ग्रामीण भागात रुग्णालयांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने प्राणवायूची मागणी वाढत आहे. प्राणवायू पुरवठ्याचे संनियंत्रण करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यास दुजोरा दिला. प्राणवायूचे उत्पादन करणारे मर्यादित आहेत. वैद्यकीय कारणास्तव वाढती गरज लक्षात घेऊन जिल्ह्याात एकूण येणाऱ्या प्राणवायुपैकी ८० टक्क्यांहून अधिक  प्राणवायू रुग्णालयांना दिला जात असल्याचे मऔविमच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणवायूयुक्त खाटा तयार करणे खर्चीक बाब असते. ही व्यवस्था तातडीने उभी करणे अवघड ठरते. यावर हवेतील प्राणवायू रुग्णास देणारी १०० यंत्रे अर्थात ‘ऑक्सिजन कॉन्सन्टे्रटर’च्या माध्यमातून मध्य मार्ग काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण खाटेवर ही यंत्रणा कार्यान्वित करता येते. याआधी महापालिकेने १०० उपकरणे खरेदी केली होती. प्राणवायू लागणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तातडीचा उपाय म्हणून आणखी १०० प्राणवायू पुरविणारी यंत्रे घेतली जाणार आहेत. – बापूसाहेब नागरगोजे (वैद्यकीय-आरोग्य अधिकारी, महापालिका)