शफी पठाण, लोकसत्ता 

पंचतारांकित भुजबळ नॉलेज सिटीच्या दिशेने धावणाऱ्या चकचकीत गाडय़ांच्या धुराने काळवंडलेल्या आणि अवकाळी पावसाच्या माऱ्याने माना टाकलेल्या द्राक्षाच्या वेली पापण्यांवरची धूळ हटवत पाहत असतात संमेलनाचा झगमगाट..इंद्रधनुषी रंगाचा महागडा सदरा घालून अन् बक्कळ मानधनाचा लिफाफा सावरत निमंत्रितांच्या कवी संमेलनात वेदनेची कविता वाचणाऱ्या कवीला ऐकत असतात कानात प्राण आणून की यात कुठे आपली वेदना दिसते का? ठरावांच्या गगनभेदी घोषणा अन् अनुमोदनाच्या अनंत निनादात शोधत असतात प्राण सोडू पाहणाऱ्या मुळांना ओल देणारा एखादा दिलासा..तो नसतोच असे नाही, असतोच प्रत्येक संमेलनात. यवतमाळात कापसाच्या बोंडांनी तो ऐकला, उस्मानाबादेत सूर्यफुलांनीही तो ऐकला, उद्या नाशकातील द्राक्षाच्या वेलीही ऐकतील. पण, त्यांचा प्रश्न एकच, ऐकण्याच्या पुढे काय? मुंबईच्या आझाद मैदानात बोचऱ्या वाऱ्यांना झेलत हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची काही लेकरेही आलीत या संमेलनात. त्यांना कुणीतरी सांगितले म्हणे, तुमच्या बापाच्या लढय़ाला बळ देणारा ठराव येईल कदाचित. तिकडे जावा, हातभार लावा, ठरावांच्या प्रती वाटायला. आता ते घुटमळताहेत मंचाच्या पायथ्याशी निवेदकाच्या हातातील कागदाकडे पाहत. त्यांचा प्रश्न एकच, आमच्या ठरावाचा क्रमांक कुठला? समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शब्दधन पोहोचविणारे वाचनालयाचे कर्मचारीही पोहोचलेत इकडे. त्यांच्याच बाजूला उभा दिसतोय घोळका विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा. ज्ञानेश्वरांचे पसायदान विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या या शिक्षकांचा एकच प्रश्न आहे, आमच्या वेतनानुदानाचा एखादा ठराव, आहे का या शब्दप्रभूंच्या संमेलनात? सलग चाललेल्या सुग्रास खानावळीत रिकामी ताटे उचलणाऱ्या महिला मध्येच थबकतात परिसंवादातील महिला सशक्तीकरणाचा उच्चार ऐकून, विचारतात ऐकमेकींना आपल्या किमान वेतनावर तर ठरत नाहीये इकडे काही? हे सर्व पाहून अस्वस्थ झालेला एखादा तरुण या सर्व प्रश्नांचे गाठोडे घेऊन गाठतोच एखाद्या पदाधिकाऱ्याला आणि विचारतो, ठरावांच्या यादीत आहे का यातला एखादा विषय? पदाधिकारी छद्मी हसतो अन् सांगतो, ठराव छापखान्यात गेलेत. उद्या आलेत की कळेलच. या समारोपाला, तशीही गर्दी हवीच आम्हाला. तो तरुण त्या प्रश्नकर्त्यां सर्व समुदायांसह पोहोचतो वेळेत. जाणता राजा येतो, ठरावांचे वाचन सुरू होते. या थंडीत हुडहुडलेले जीव वाट पाहतात आपल्यावरील ठरावाची. तो ठराव अखेर येतो खरा, पण तोही सोपस्काराच्या थंडीने गारठलेला असतो सालाबादाप्रमाणे. त्याचा क्षीण आवाज मंचाच्या पलीकडे पोहोचतच नाही. मग, दूरवरचे सरकार ऐकणार तरी कसे?