सुरक्षारक्षकास विद्यार्थ्यांनी चोपले
महाविद्यालयात शिक्षिकांच्या स्वच्छतागृहात भ्रमणध्वनीत छायाचित्रण करताना खासगी सुरक्षारक्षकास पकडण्यात आले. येथील डोंगरे वसतिगृह मैदानावरील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांनी संशयितास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या इमारतीत हा प्रकार घडला. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास शिक्षिका स्वच्छतागृहात गेल्या असता शिक्षक स्वच्छतागृहात संशयित सुरक्षारक्षक अनिल पवार (२५, शरणपूर रस्ता) आधीपासून होता. कशावर तरी उभे राहून तो महिलांच्या स्वच्छतागृहाचे भ्रमणध्वनीत चित्रण करत असल्याचे एका शिक्षिकेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केल्यावर तो पळाला. शिक्षिकेने बाहेर येऊन ओरड सुरू केल्यावर विद्यार्थ्यांनी पाठलाग करत पवार याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी महाविद्यालयाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सुरक्षारक्षकाचा भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची शहानिशा तपास यंत्रणा करीत असून दोषींवर कारवाई व्हायला हवी, ही संस्थेची भूमिका आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संशयित व्यक्ती महाविद्यालयीन कर्मचारी नसून तो खासगी सुरक्षारक्षक आहे. सुरक्षेसाठी खासगी संस्थेकडून कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याचे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.