‘पाणी समस्या, धरणे व नद्यांची स्थिती’ विषयावर मंथन
पाणी वापरासंदर्भातील नियोजनशून्यता, पाणी वाटपाची मोजणीच न होणे, लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा, भूगर्भातून होणारा अवाजवी उपसा या सर्वाबद्दल येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित नाशिक जिल्ह्य़ातील पाणी समस्या धरणे व नद्यांची स्थिती या विषयावरील चर्चासत्रात जलतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.
देशातील अनेक राज्यांना पाणी समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर रुप धारण करत आहे. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून लोकांत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. नैसर्गिक पद्धतीने जीवन व पीक पद्धतीही हवी. ज्यामुळे नैसर्गिक स्त्रोत निरंतर टिकून राहतील. पाण्याचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज असल्याचे जलतज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे यांनी सांगितले. आपल्याकडे हंगामी पाऊस पडतो आणि आपण बारमाही सिंचन त्या पाण्यावर करतो. वास्तविक हंगामी पावसात हंगामीच पिके घ्यायला हवीत. पण ती घेतली जात नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात भूजल पातळी खालावलेली आहे. भूजलातील पाणी आरोग्यदृष्टय़ा शुद्ध राहिलेले नाही. त्याचा सतत उपसा करणे िंचंताजनक आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हास्तरीय पाणीवापर संस्था यांना पाणी मोजून देण्याची व्यवस्था बसवून दिली पाहिजे. आज प्रत्यक्षात पाणी वाटप विविध धरणांतून किती होते, किती वापरले जाते, कशासाठी वापरले जाते, याची मोजणीच होत नाही, याबद्दल डॉ. मोरे यांनी चिंता व्यक्त केली. जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी आज एकही धरण आपण अतिरिक्त बांधू शकत नसल्याची व्यथा मांडली. लागोपाठ तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाचे पाणी आपण नियोजनपूर्वक न साठवल्यामुळे आज पाण्यावरून भांडणे होत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा व जलसंपदा अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प रखडले असल्याचा आरोप जाधव यांनी केला. आपल्या हक्काचे पाणी आज गुजरातकडे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यास वेळीच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी विरोध करायला हवा. वाढती लोकसंख्या, शहरीपणा, औद्योगिकीकरण यासाठी पाण्याचा वापर भविष्यात वाढणारच आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जाधव यांनी आकडेवारीसह नाशिकसाठी भविष्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत महत्वपूर्ण माहिती सादर केली. दमणगंगा, गोदावरी, उल्हास, वैतरणा, भातसा, नार, पार, कडवा आदी नद्यांच्या खोऱ्यात उपलब्ध पाणीसाठा आणि वापर यांची सविस्तर माहितीही दिली. प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी नाशिक जिल्ह्य़ाच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचे पावसाचे प्रमाण, नद्यांच्या पाण्याची उपलब्धता आकडेवारीनुसार सादर केली. गोदावरी खोऱ्यात पाच कोटी लोकसंख्या आहे. राजकीय अनिच्छेमुळे पाण्याचे ज्या प्रमाणात नियोजन व्हायला हवे होते ते होत नाही. शिवाय त्यासाठी लागणारा वित्त पुरवठाही केला जात नाही. त्यामुळे गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. गुजरात व महाराष्ट्र सरकार यांच्यात १९९७ मध्ये झालेल्या पाणीवाटप कररानंतर गुजरात सरकारने १८ टीएमसीचे मधुबन धरण बांधले. परंतु आपण अद्यापही आपल्या हक्काचे पाणी वळवलेले नाही, साठवलेले नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. डॉ. कुटे यांनी शासनाच्या विविध चुकीच्या धोरणांची माहिती दिली. यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वंदना बागूल यांनी केले.

Story img Loader