नाशिक : शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आणि ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर (५८) यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेनेच्या लढवय्या पदाधिकारी म्हणून त्या परिचित होत्या. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सिडकोतील नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन झाले असतांना गाडेकर यांच्या रुपाने महिला शिवसैनिकांना दुसरा धक्का बसला आहे.
महापालिकेच्या १९९२ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत गाडेकर या नाशिकरोड विभागातून निवडून आल्या. महापालिकेत सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अनेक पदे भूषविली. सध्या त्या प्रभाग २२ चे प्रतिनिधित्व करीत होत्या. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील करोना योद्ध्यांना वैद्यकीय विम्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात आवश्यक त्या सुविधांची
पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी आंदोलनही केले. आक्रमक भूमिका घेण्याच्या शैलीमुळे शिवसेनेत अनेक संघटनात्मक पदांवर त्यांची नियुक्ती झाली.
शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण करताना गाडेकर या लढवय्या नेत्या होत्या, सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे जनतेसाठी तत्पर असलेले लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे नमूद केले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वर्षानुवर्ष बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे अशा प्रकारे अचानक आपल्यातून निघून जाणे ही मनाला वेदना देणारी घटना असल्याचे म्हटले आहे.