शेतातील काम आटोपून महिला मजुरांना घराकडे घेऊन निघालेला ट्रॅक्टर बंधाऱ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दाभाडी-अजंग रस्त्यावर घडली. बंधाऱ्यात बुडालेल्या अन्य महिलांची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ट्रॅक्टरमध्ये एकूण २४ महिला मजूर असल्याचे सांगितले जाते. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अजंग-वडेल गावातील महिला रावळगाव परिसरात जमिनी कसणाऱ्यांकडे ट्रॅक्टरद्वारे कामासाठी जातात. काम आटोपल्यावर ट्रॅक्टरद्वारे त्या परतत असताना ढवळीविहीर शिवारात ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या बंधाऱ्यात कोसळला. या वेळी दोन-तीन महिलांनी पाण्यातून बाहेर पडत जीव वाचवला. काठावर येऊन त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वडनेर खाकुर्डी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मालेगावच्या अग्निशमन दलाच्या साहाय्याने मृतदेह व जखमींना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत सात महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात रोहिणीबाई शेलार, संगीता भदाणे, उषा भदाणे, आशाबाई मळके, सुनंदा शेलार (सर्व रा. वडेल) यांची ओळख पटली आहे.
जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. बंधाऱ्यात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. ट्रॅक्टरमध्ये नेमक्या किती महिला होत्या, याची स्पष्टता उशिरापर्यंत झालेली नाही.