लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता चांदवड तालुक्यातील भयाळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शनिवारी कुपवाडय़ात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल १८ तास चाललेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. तर, दोन जवान शहीद झाले. त्यातील एक भयाळे येथील शंकर चंद्रभान शिंदे (३५) होय. शिंदे यांचे पार्थिव सायंकाळी सहाच्या सुमारास ओझर येथील एचएएलच्या विमानतळावर मुंबईहून विशेष विमानाने आणण्यात आले. विमानतळावर लष्कराच्या वतीने पार्थिवास मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल जे. एस. बेदी, ब्रिगेडियर पी. आर. मुरली, एअर कमोडोर विभास पांडे, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आणि प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदीप आहेर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शंकर शिंदे यांचे बंधू केशव शिंदे, चुलतभाऊ कैलास शिंदे, अंबादास शिंदे उपस्थित होते. पार्थिव देवळाली कॅम्प येथील लष्करी रूग्णालयात रात्रभर ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.
सुमारे १४०० लोकसंख्या असलेल्या भयाळे या गावातील ८० पेक्षा अधिक जवान सैनिक आहेत. शंकर शिंदे यांना वीरमरण आल्याचे वृत्त भयाळे येथे आल्यावर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शिंदे यांच्या पश्चात आई सुमनबाई, वडील चंद्रभान, पत्नी सुवर्णा, सहा वर्षांची मुलगी वैष्णवी व दीड वर्षांचा ओम यांच्यासह वडील बंधू, दोन बहिणी असा परिवार
आहे.
शिंदे हे १७ वर्षांपासून सैन्यदलात होते. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले शिंदे हे मनमिळावू आणि समंजस स्वभावामुळे गावातील सर्वानाच आपलेसे वाटत. त्यामुळे शिंदे यांच्या वीरमरणाने प्रत्येक जण हळहळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2016 रोजी प्रकाशित
शंकर शिंदे यांच्या वीरमरणाने भयाळे हळहळले
सकाळी १० वाजता चांदवड तालुक्यातील भयाळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-02-2016 at 02:03 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankar shinde passes away