जळगाव : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चे घटक पक्ष भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. प्रत्यक्षात, बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत मिळाल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी दमदार विजय मिळवला असून, एनडीएने सहजपणे बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे आरजेडीला ३० पेक्षाही कमी जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची स्थिती तर आणखी दुबळी झाली असून १० जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. एकूणच, या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठे यश मिळवले आहे. पक्षाने बिहार निवडणुकीच्या मैदानात एकूण ११० उमेदवार उतरवले होते. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने देखील बिहारमध्ये १९ जागा जिंकल्या आहेत.

लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव याचा बिहार निवडणुकीत पराभव झाला आहे. तेजप्रताप यादव स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तसेच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला बिहार निवडणुकीत एकूण ३.४४ टक्के मते मिळाली आहेत. लढवलेल्या २३८ जागांपैकी ६८ जागांवर ते नोटापेक्षा मागे राहिले. या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केले. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिलेले नाही, तर लाडकी बहीण योजनेला बहुमत दिले आहे. लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातून आधी महाराष्ट्रात, त्यानंतर बिहारमध्ये पोहोचली. इथे महाराष्ट्रात लाडक्या बहि‍णींना १५०० रूपये दिले, तर तिथे बिहारमध्ये तब्बल १० हजार रूपये दिले. अर्थात, १० हजार रूपयांच्या प्रलोभनामुळे महिलांनी एनडीएला मोठ्या प्रमाणावर मतदान केले, असे आमदार खडसे म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेले बहुमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कामगिरीचे फलित नसून, प्रत्येक घरात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे वाटप झाल्यानंतर निर्माण झालेल्या प्रलोभनाचा परिणाम आहे, अशीही टीका आमदार एकनाथ खडसे यांनी केली. खडसे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान मतदारांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देण्यात आली. त्यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारची अपेक्षा निर्माण झाली आणि त्या मोहाला बळी पडून मतांचे ध्रुवीकरण झाले. यामुळेच एनडीएने बहुमताचा टप्पा पार केला.