वयाच्या ८२ व्या वर्षी शरद पवार यांनी आपल्या मुलीच्या हितासाठी पक्षात अत्यंत लोकप्रिय असलेल्या अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या कृतीमुळे खूप संभ्रम निर्माण झाला होता, असा आरोप खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे यांनी आपल्या कामाची सुरुवात भटक्या-विमुक्त चळवळीतून केली. उपराकार लक्ष्मण माने हे साताराच्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्यासह सुप्रिया सुळेही काम करू लागल्या. नंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षात काम करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. मग, सुप्रिया सुळे राज्यसभेत गेल्या. दोन वर्षांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता सुप्रिया सुळे यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे.”

हेही वाचा : “ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ”, वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवारांचा अजित पवारांना टोला

“या वाटचालीत सुप्रिया सुळेंना सत्तेचं कोणतेही स्थान मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यावर सुर्यकांता पाटील आणि आगाथा संगमा यांना मंत्रीमंडळात स्थान दिलं. लोकसभेत पराभव झाल्यानंतर प्रफुल पटेल यांना राज्यसभेवर संधी दिली. दहा वर्षे प्रफुल पटेल केंद्रात मंत्री होते,” असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : माजी खासदार आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार आहेत. त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नव्हती. पण, पक्षाने सुप्रिया सुळेंऐवजी सुर्यकांता पाटील, आगाथा संगमा आणि प्रफुल पटेल यांना संधी दिली. काही लोक मला नेहमी म्हणायचे, तुम्ही सुप्रिया सुळेंवर अन्याय केला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं.