भाजप व राष्ट्रवादीनंतर सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. सेनेच्या तंबूत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मुलाखतीवेळी इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसच्या मुलाखतीत एका प्रभागामध्ये बोटावर मोजण्याइतपतच इच्छुक दिसून आले.

राज्य पातळीवर युती होईल की नाही, याचा विचार न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करत भाजपने आधीच मुलाखत प्रक्रिया पूर्णत्वास नेली. मित्रपक्षाच्या कृतीवर आगपाखड करत सेनेने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या उद्देशाने मुलाखत प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. या माध्यमातून पदाधिकारी पक्षीय ताकद काय असेल याचा अभ्यास करत आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घाऊक पक्षांतर झाले. त्यात शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी होती. निष्ठावंतांना न डावलता सर्वाना समान संधी दिल्याचे वरकरणी दाखविण्याचा प्रयत्न मुलाखतीद्वारे होत आहे. सोमवारी शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. यासाठी शहर पातळीवर खास समिती गठित करण्यात आली आहे. त्यात खा. हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख अजय चौधरी, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे. समितीमार्फत दोन दिवसांत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.  पक्षासाठी तुम्ही काय केले, प्रभागनिहाय रचना काय, तुमचे विरोधक कोण, प्रभागातील समस्या कोणत्या, असे प्रश्न उपस्थित करत अवघ्या दोन ते तीन मिनिटांत मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रश्न जवळपास एकसारखे असल्याने इच्छुकांनी उत्तरे आधीच तयार करून घेतली. तुमचा विरोधक कोण, या प्रश्नावर इच्छुकांनी स्थानिक पातळीवरील अंतर्गत वाद, बुथ किंवा प्रभागप्रमुखांची कार्यशैली यावर टीका केली. त्यामुळे निवड समितीला तुम्ही तुमच्याविषयी बोला अशी सूचना करावी लागली. काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. आपल्यासोबत किती मंडळी आहेत याचे दाखले दिले. तेव्हा समितीने निवडणुकीच्या निकालात सोबत किती असतील असे विचारत संबंधितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. या वेळी ७० वर्षांच्या आजींनी आपणही उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिल्याचे सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच पूर्ण केलेली युवती वडिलांच्या आग्रहाखातर मुलाखतीस आली होती. वडिलांमुळे राजकारण आपण पाहिलेले आहे. निवडणूक लढण्याची वेळ आली तर याचा केंद्रबिंदू आपण राहू, याचे अप्रूप असल्याचे तिने सांगितले. इच्छुकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे शालिमार चौक परिसर व्यापला गेला. शिवसेनेकडून ८१० अर्ज इच्छुकांनी नेले असून सर्वच जागांवर सक्षम उमेदवार दिले जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शहरानंतर जिल्हा परिषदेसाठी मुलाखती होणार आहेत. या वेळी काहींनी सेनेत प्रवेश करत लगेच मुलाखतीही दिल्या.

काँग्रेस कार्यालयात जेमतेम स्थिती

शिवसेना कार्यालयात इच्छुकांची झुंबड उडाली असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मुलाखत सत्राकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. नियोजित वेळ उलटून गेल्यानंतर दुपारी साडेबारा-एकच्या आसपास मुलाखतींना सुरुवात झाली. या वेळी इच्छुक उमेदवार कमी आणि कार्यकर्ते व त्यांच्या सोबत नातेवाईक जास्त अशी स्थिती होती. इच्छुकांनी २०० हून अधिक अर्ज नेल्याचा दावा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केला. परंतु प्रत्येक प्रभागातील चार जागांवर उमेदवार उभे करता येतील इतके इच्छुकही दिसले नाही. पक्ष निरीक्षक, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री शोभा बच्छाव, शैलेश कुटे, सुचेता बच्छाव यांच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरुवात झाली. या वेळी निवड समितीने पक्षाचा इतिहास, कोणकोणत्या आंदोलनात सहभागी झालात, पक्षाकडून अन्य जे तीन सोबत असतील किंवा अन्य उमेदवार दिले जातील, त्यांच्यासोबत काम कराल का, आदी विचारणा केली. काही हौशी कार्यकर्त्यांनी शैक्षणिक अर्हतेपासून राजकीय आंदोलनातील सहभागापर्यंतची कात्रणे निवड समिती समोर ठेवली. काहींच्या हातात काँग्रेसकडून नाही तर राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल यासाठी काही माहिती पत्रके हाती ठेवत त्यांचे प्रमुख नेते कोण, त्यांचा अजेंडा काय, याची घोकमपट्टी सुरू ठेवली. २०० हून अधिक अर्ज जाऊनही मोजक्याच इच्छुकांनी हजेरी लावली. या स्थितीत स्वबळाऐवजी राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडणार असल्याचे काही नवख्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.