राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी मागील तीन महिन्यांपासून घडत असतानाच शनिवारी यामध्ये एक नवा अध्याय जोडला गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरीतील पोटनिवडणुकीआधी ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. यासंदर्भात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच नाशिकमधील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्याचा उल्लेख करत विचारलेल्या प्रश्नाला रितेशनेही सविस्तर उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

नाशिकमध्ये पत्नी जेनेलियासोबत एका कार्यक्रमासाठी हजर असलेल्या रितेशने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, राजकारणात सुद्धा तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे, असं म्हणत एका पत्रकाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो प्रश्न पूर्ण होण्याआधीच रितेशने, “राजकारणात माझ्यासारख्या तरुणांची गरज आहे?” असा प्रतिप्रश्न विचारला. त्यानंतर लगेचच, “माझ्याच घरातील दोन तरुण आधीच राजकारणात आहेत,” असं उत्तर दिलं तेव्हा त्याच्या बाजूला बसलेली त्याची पत्नीही हसल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

“तुम्ही आलात तर बरं होईल. तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे काँग्रेसला,” असं पत्रकारने म्हटलं त्यावर रितेश केवळ हसला. यावरुनच अन्य एका पत्रकारने, राज्यात सध्या जी स्थिती दिसते आहे राजकारणाची ती पाहिल्यावर काय वाटतं असा प्रश्न विचारला. “कालच शिवसेनेसारख्या पक्षाचं चिन्ह रद्द करण्यात आलं आहे. शिवसेना नाव सुद्धा गोठवण्यात आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? जे काही राजकारण सुरु आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?” असा थेट प्रश्न रितेशला विचारण्यात आला.

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

यावर उत्तर देताना रितेशने, “राजकारण, समाजकारण याची योग्यता ठरवणारा मी कोणीच नाही. मी फार छोटा व्यक्ती आहे. हो, राजकारण मी पाहतो. फार जवळून पाहतोय आणि वाचतोय. तुमच्यासारखं मला त्याच्याबद्दल आकर्षण आहे. पहायला आवडतं. कसं चाललं आहे, काय घडामोडी होत आहेत,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

तसेच, “हे सगळं आता एका वेगळ्या दिशेला चाललं आहे. पण मला नक्की पहायला आवडेल की आता पुढे काय होतं. कारण येणाऱ्या काळात जे घडणार त्यावरुन आपल्याला आपलं राजकीय भविष्य कळणार आहे. राजकारणाचं नेमकं भविष्य काय असणार आहे हे आपल्याला आता येणाऱ्या घडामोडींमध्ये कळेल,” असंही रितेश म्हणाला.