जळगाव : पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तूर्त अटकेची शक्यता टळल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेत उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने सुमारे पाच कोटी ३३ लाख रूपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते कालांतराने एनपीए घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत दिली; परंतु, कर्जाची रक्कम वेळेवर भरली न गेल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली. माजी खासदार उन्मेश पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्र सामग्री संगनमताने विकल्याचे उघड झाले. या व्यवहारामुळे देवगिरी बँकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानुसार माजी खासदार पाटील यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर माजी खासदार पाटील यांच्यासह इतरांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आपण कर्जदार नाही तर फक्त जामीनदार आहोत, असा दावा करून माजी खासदार पाटील यांनी जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यातर्फे ॲड. वसंत ढाके यांनी युक्तिवाद केला. न्या. एस. व्ही. खोंगल यांनी उन्मेष पाटील यांना ५० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान, आवाज बंद करण्यासाठीच आपल्याला भाजपने गोवल्याचा आरोप माजी खासदार पाटील यांनी केला. पार्थ पवार ९९ टक्के भागीदार असतानाही त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई होत नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावे बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता खरेदी केली जाते, तरी कुणावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा ही चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे. तीन-चार कोटींच्या मूल्यावर त्यांना बँकेकडून १२ कोटींचे कर्ज दिले जाते, तरी त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही. देवा भाऊ, हा कसला न्याय ?, असाही प्रश्न माजी खासदार पाटील यांनी उपस्थित केला. तसेच जेव्हा मी बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणावर भाष्य करतो, तेव्हा काही लोकांना ते झोंबतं. आणि त्यानंतर तीन दिवसांत माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. इतक्या महिन्यांपासून कारवाई झाली नव्हती, मग अचानक तीन दिवसांत गुन्हा कसा दाखल झाला ? हा स्पष्टपणे राजकीय सूडाचा भाग असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले.