मेनरोडवर सोमवारीही दुतर्फा दुकाने उघडी

नाशिक : टाळेबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून शनिवारपासून शहरात ‘सम-विषम’ पध्दतीने दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न पहिल्याच दिवशी फसला. याच चुकांची पुनरावृत्ती सोमवारी पुन्हा झाली. शहर परिसरातील मध्यवर्ती परिसरातील बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवरील दोन्ही बाजुंची दुकाने नेहमीप्रमाणे सुरु राहिल्याने परिसरात नागरिकांसह वाहनचालकांची वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी  झाली. शारीरिक नियमांचे अंतर, मुखपट्टी या सर्व नियमांचा बोजवारा उडाला. दुसरीकडे, निर्बंध शिथील झाल्याने आर्थिक घडामोडी वेग घेत असल्या तरी शहर परिसरात करोनाग्रस्त रुग्णांचा आलेखही झपाटय़ाने वाढत आहे.

टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुन्हा सुरूवात’ म्हणत विविध निर्बंध शिथील केले. सोमवारपासून अटीशर्तीसह खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली. यासाठी आस्थापना, व्यापारी, महापालिका पदाधिकारी यांच्या बैठका झाल्या. गर्दी होऊ नये या अनुषंगाने नियोजन करतांना सम-विषम तत्वावर दुकाने सुरू करण्याची मुभा दिली गेली. यात सम तारखांना एका बाजूकडील आणि त्यासमोरील दुकाने विषम तारखेला उघडण्याच्या निर्णयाच्या अमलबजावणीविषयी  अस्पष्टता असल्याने सोमवारी या निर्णयाला दुकानदारांनी केराची टोपली दाखवली.

महात्मा गांधी रोड, मेनरोड, रविवार कारंजा, शालिमारसह शहरातील इतर रस्त्यांवर दोन्ही बाजुला असलेली दुकाने सुरू राहिली. निर्बंध शिथील होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली.

रविवार कारंजा, महात्मा गांधी रस्त्यावर मोठय़ा संख्येने चारचाकी, दुचाकी वाहने उभी करण्यात आली. मुळात खरेदीसाठी वाहन वापरण्याची परवानगी नसतांनाही दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक वाहने रस्त्यावर बिनधिक्कत आल्याने मुख्य रस्त्यासह पर्यायी मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोडींला तोंड द्यावे लागले.

दिवसभरात वाहतुकीची वर्दळ आणि कर्णकर्कश भोंग्यांमुळे वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरत वाहतूक नियमांचे धडे वाहनचालकांना द्यावे लागले. अनेक भागात सम-विषमचे क्षेत्र निश्चित न झाल्याने गोंधळ उडाला. सार्वजनिक वाहन व्यवस्था सुरू नसतांनाही अनेकांनी आपल्या दुचाकीवर तर कोणी पायपीट करत आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी गर्दी केली. हीच स्थिती बँक, टपाल कार्यालयात होती. निर्बंध शिथील केल्याचा अर्थ टाळेबंदीची जणूकीह मुदत संपली असा घेत अनेकांनी आपले राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली. जिल्हा न्यायालयाचे कामकाजही सोमवारपासून नियमीत सुरू झाल्याने या परिसरात नेहमीच्या तुलनेत वर्दळ राहिली.

दरम्यान, महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेनरोडसह अन्य ठिकाणी फेऱ्या मारत दुकानदारांना समज दिल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. रस्त्यावर घोळका, शारीरिक अंतर पथ्याला फाटा देत किरकोळ विक्रेत्यांनी या गर्दीत संधी शोधत प्रशासकीय नियमावलीला तिलांजली देत काम सुरू ठेवले. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

..अन्यथा बाजारपेठा बंद

टाळेबंदी शिथील करतांना व्यापारी तसेच व्यापारी संघटनांसोबत बैठका झाल्या. यामध्ये स्पष्टपणे आदेश देऊनही जर व्यापारी, विक्रेत्यांना समजत नसेल तर बाजारपेठा बंद करण्यात येईल. तसेच महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शासकीय नियम न पाळणारे व्यापारी, विक्रेत्यांचे दुकान बंद करण्यात येईल. व्यापाऱ्यांसोबत नागरिकांनीही आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान बाळगावे.

– प्रदीप चौधरी  (महापालिका उपायुक्त)