या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव येथे तोडणीवर आलेला सुमारे चार एकर ऊस विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाला. धामणगाव परिसरात जोरदार वारा वाहत असताना विठ्ठल उगले, अशोक गाढवे, रामदास गाढवे, राजाराम गाढवे या शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या आणि लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ (ठिणग्या) उसाच्या शेतात पडल्याने उसाच्या वाळलेल्या पाचोळ्याने पेट घेतला.

वारा जोरात वाहत असल्याने आग पसरतच गेली. आग विझविण्यासाठी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गाढवे, शेतकरी नेते महेश गाढवे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी आसपासच्या परिसरातील माणसांना बोलावून पाणी वाहून ट्रॅक्टरच्या साहाय्याने तब्बल चार ते पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. महेश गाढवे, नंदू उगले, रतन गाढवे, पंढरी गाढवे,भाऊसाहेब गाढवे, विष्णू गाढवे, विठ्ठल उगले यांच्यासह बहुसंख्य महिलांच्या प्रयत्नांमुळे आग विझविण्यात यश आले.

शेतकऱ्यांच्या घराशेजारील जनावरांच्या गोठ्यातून वैरण, पेंढा, गवत आगीपासून वाचविण्यासाठी धामणगावातील सर्व शेतकऱ्यांनी जिकिरीचे प्रयत्न केले. त्यामुळे किमान वैरण वाचविण्यात यश आले. आगीत विठ्ठल उगले यांचा एक एकर, अशोक गाढवे (रमेश गाढवे) यांचा दोन एकर, रामदास गाढवे यांचा एक एकर तसेच राजाराम गाढवे या शेतकऱ्यांच्या चार ते पाच एकर तोडीस आलेल्या उसाचे नुकसान झाले. सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे इतर ऊसक्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित विभागाने नुकसानभरपाई द्यावी तसेच या शेतकऱ्यांच्या शेतातील वर्षानुवर्षे लोंबकळत आलेल्या विजेच्या तारा आणि विद्युत खांब बदलावेत, अशी मागणी बाळासाहेब गाढवे, शिवसंग्रामचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गाढवे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, घटनास्थळी वीज वितरणचे साकुर उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अमित धारणकर आल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी शेतातील जुन्या विद्युत तारा आणि खांब तात्काळ बदलण्याची मागणी के ली.

तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जवळपास चार एकर ऊस आगीत जळून खाक झाला. ही परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून शेतातील जुन्या विद्युत तारा, खांब संबंधित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बदलावेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित विभागाने भरपाई द्यावी. – बाळासाहेब गाढवे (जिल्हा परिषदेचे माजी सदस्य)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short circuit fire four acres of sugarcane dust akp
First published on: 01-12-2020 at 00:31 IST