येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ बजरंग परदेशी याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव सवरेत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बुधवारी पुणे विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कुलगुरूंच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, पदक असे आहे. पंजाब येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत सिद्धार्थने तीन सुवर्णपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.
पुणे विद्यापीठाने या कामगिरीची दखल घेऊन त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. याआधी बँकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्ण व एक कास्य पदक पटकावले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्विमिंग (डायव्हिंग) या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवणाऱ्या सिद्धार्थचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.