मालेगाव येथे दांडगा जनसंपर्क, अरबी, उर्दू भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य
प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता
मालेगाव : करोनाचे केंद्र बनलेल्या मालेगावातील जनतेला या आजाराविषयी नसणारे गांभीर्य आणि आरोग्य संदर्भातील जागृतीचा पदोपदी जाणवणारा अभाव यामुळे करोना संकटाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची येथे समन्वयक म्हणून नियुक्ती केली. तेथील परिस्थिती सुधारण्यात कडासने यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांना भावेल अशा पद्धतीने थेट उर्दू, अरबी भाषेत संवाद साधण्याचे असलेले कौशल्य यामुळे शहरातील परिस्थिती आता हळूहळू बदलत असून ज्या उद्देशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली, तो हेतू बऱ्यापैकी साध्य होताना दिसत आहे.
करोना संसर्गाच्या भीतीपोटी मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ देण्यास नाशिक आणि धुळ्यातील जनतेचा सक्त विरोध, नीट उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये व्यवस्थेबद्दल खदखदणारा असंतोष अशी चिंताजनक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कडासने यांनी नेटाने प्रयत्न सुरु केले आणि त्याचे दृश्य परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पथकांकडून हाती घेण्यात आलेल्या शोध मोहिमेचा संबंध थेट नागरिकत्व कायद्याशी जोडण्यासही काहींनी कमी केले नाही. झोपडपट्टय़ांचे शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात आरोग्यविषयक जागृतीचा अभाव असण्याची समस्या तर पूर्वापार चालत आलेली. या सर्व कारणांचा परिपाक करोना संकट अधिक गहिरे होण्यात झाला.
या एकंदरीत निराशाजनक वातावरणात लोकांमध्ये प्रशासकीय यंत्रणांबद्दलचा विश्वास निर्माण होण्यासह करोनाविषयक जागृती निर्माण करण्याचे मोठे आव्हान व्यवस्थेसमोर उभे ठाकले. त्यासाठी शासन आणि जनतेत उत्तम समन्वय साधण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडासने यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. सद्य:स्थितीत करोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असलेले यश, लोकांमध्ये रुजत चाललेली जागरुकता आणि त्यांच्या मानसिकतेत होणारा सकारात्मक बदल यात कडासने यांची एकंदरीत भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे. याआधी चार वर्षे मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कडासने यांनी अशा प्रकारची दरीच नष्ट केली होती. त्यावेळी जनसंपर्काचे चांगले जाळे त्यांनी शहरात निर्माण केले. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली होती.
मुस्लीमबहुल मालेगावाची गरज ओळखून तेव्हा उर्दू आणि अरबी या भाषांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था तसेच सार्वजनिक हितासाठी ते कुराणामधील आयतांचे दाखले देऊ लागले. त्यामुळे हिंदूंप्रमाणेच
मुस्लीम समाजात त्यांची आपला माणूस अशी एक प्रतिमा निर्माण झाली. त्यांची ही प्रतिमा आणि लोकप्रियतेची करोना संकटकाळात चांगली मदत होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक अडचणीवर यशस्वी तोडगा
शहरात एकीकडे करोनाने थैमान मांडले असताना अनेक रुग्णालये बंद असल्याने करोना व्यतिरिक्त अन्य आजारांनी बेजार रुग्णांची हेळसांड सुरू होती. ही हेळसांड थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच महापालिकेतर्फे १४ युनानी डॉक्टरांची नियुक्ती झाली. खासगी डॉक्टरांना संरक्षण साधने पुरविण्यात आल्यानंतर आज जवळपास शहरातील सर्व खासगी रुग्णालये सुरू झाल्याचे दिसत आहे. टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद असल्याने मजुरांना रोजीरोटीचा प्रश्न सतावत असल्याचे बघून यंत्रमाग कारखाने सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार शासनाची परवानगी प्राप्त झाल्यावर पहिल्याच दिवशी शहरात सहा हजार यंत्रमाग सुरू होऊ शकले. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर घरोघरी जाऊन रुग्ण शोधमोहिमेचे काम करणाऱ्या ‘आशा’ स्वयंसेविकांच्या प्रतिदेखील त्यांनी अशीच संवेदना प्रकट केली. दरमहा अवघ्या दोन हजार रुपये मानधनावर डॉक्टरांप्रमाणेच दिवसभर जोखीम उचलणाऱ्या या महिलांचे मानधन वाढवून देण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार महापालिकेने हजार रुपयांची वाढ केली.