रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात आंदोलन
पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शहरातील स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्याविषयीचा असंतोष सोमवारी आंदोलनातून प्रगट झाला. रखडलेल्या कामामुळे शालेय विद्यार्थी, वाहनधारक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबक नाका परिसरात आंदोलन करण्यात आले. स्मार्ट कंपनीने केलेल्या अन्य कामांवरही आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून वारेमाप खर्च करून कोणत्या प्रकल्पाने शहराच्या सौंदर्यात भर पडली? असा प्रश्न उपस्थित केला.
अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान कामास बराच विलंब झाला आहे. स्मार्ट रस्त्याच्या कामाची मुदत कधीच संपुष्टात आली. अनेकदा मुदतवाढ देऊनही ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. काम पूर्ण होत नसताना त्यावरील खर्च वाढत आहे. अलीकडेच स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोटय़वधींच्या वाढीव खर्चाला मान्यता दिली गेली. संबंधित ठेकेदाराला १ एप्रिलपासून ३६ हजार रुपये प्रतिदिन दंड आकारला जाणार अहे. शिवाय कंपनीने स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी १५ ऑगस्टची नवीन मुदत दिली आहे. या कामामुळे त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ एकेरी वाहतूक होत आहे. अशोक स्तंभ, रविवार कारंजा या भागातून वाहनधारकांना जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, मुख्य बसस्थानक या ठिकाणी पोहचण्यासाठी पर्यायी मार्गावरून जावे लागते. मध्यवर्ती भागातील पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण आल्याने तिथे प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यात विरुद्ध दिशेने वाहनधारक मार्गस्थ होत असल्याने अशोक स्तंभ, त्र्यंबक नाका चौकात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे. रस्त्याची एक बाजू खोदलेली तसेच अर्धवट कामात असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक विविध फलक घेऊन त्र्यंबक नाका पेट्रोल पंप परिसरात जमले. त्यांनी स्मार्ट सिटी कंपनी, पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्मार्ट रस्त्याच्या नावाखाली कंपनीने खर्चीक आणि अनावश्यक काम लादले असून ते नागरिकांना त्रासदायक ठरल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
प्रकल्पांची भाजपकडून ‘वाट’
पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील प्रकल्पांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाट लावण्याचा विडा उचलला आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी कोणती कामे करायला हवीत, जेणेकरून शहरवासीयांना त्याचा लाभ होईल याची कोणतीही माहिती नगरसेवक, नागरिकांना मिळत नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत आजवर झालेल्या कालिदास कला मंदिर, नेहरू उद्यान, कला दालन नूतनीकरण या कामांवर अतिरिक्त खर्च केला गेला. शहराच्या सौंदर्यात भर पडेल असे काम त्यातून झालेले नाही. मखमलाबाद शिवारात हरित नाशिकचा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात आहे. कंपनीतील भाजपच्या संचालकांच्या भूमिकेत परस्पर विसंगती आहे. एकाच विषयपत्रिकेत रस्ते ठेकेदाराला दंड आणि वाढीव रक्कम देण्याचा ठराव करणारी स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार हास्यास्पद आहे. – डॉ. हेमलता पाटील (नगरसेविका)