मालेगावमध्ये पुन्हारुग्णवाढ

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या २१ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून आतापर्यंत ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ३५२ जणांचा समावेश आहे. उपचाराअंती सुमारे १५ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेल्या मालेगावमध्ये रुग्णांची संख्या अकस्मात वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या अहवालावरून करोना अद्याप नियंत्रणात आला नसल्याचे दिसून येते. दिवसागणिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत ६२० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील आधिक्याने रुग्ण आहेत.  नाशिक ग्रामीणमधील १५६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ३५२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ९१ आणि जिल्हाबाहेरील २१ रुग्णांचा समावेश आहे. विविध व्याधी असणारे, घरगुती उपचार करणारे, लक्षणे असूनही पुढे न येणे, भीती अशा विविध कारणांस्तव करोनामुळे मृत्यू होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्य़ात करोनाचे आतापर्यंत २० हजार ५५२ रुग्ण आढळले. त्यातील १४ हजार ८६४ रुग्णांना उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. आतापर्यंत १५ हजार २८१ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. सद्य:स्थितीत चार हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक २९४, चांदवड ३५, सिन्नर २३४, दिंडोरी ५५, निफाड २१०, देवळा ७५, नांदगांव ७०, येवला १०, त्र्यंबकेश्वर सहा, सुरगाणा ११, कळवण चार, बागलाण ६०, इगतपुरी ४५, मालेगाव ग्रामीण ८५ असे एकूण ११९४ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार १४३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ३०५, तर जिल्ह्य़ाबाहेरील १० अशा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन महिन्यांपूर्वी मालेगावमध्ये करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला होता. नंतर सर्वाच्या सामूहिक प्रयत्नाने त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जिल्ह्य़ात सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असताना मध्यंतरी मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या बरीच कमी झाली होती; परंतु आता तेथेही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याची साशंकता व्यक्त होत आहे. सध्या या ठिकाणी ३०५ रुग्ण आहेत. बाधितांच्या संपर्कातील १३९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. नाशिक ग्रामीणमधील ४८२, नाशिक मनपा ३६७ असे एकूण ९८८ जणांच्या नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.५० टक्के

करोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वृद्धिंगत होत आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची ७४.५० इतकी टक्केवारी आहे. यात नाशिक ग्रामीणमध्ये ७२.४६, नाशिक शहरात ७४.९९, मालेगावमध्ये ७५.५७  टक्के, तर जिल्हाबाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६  टक्के आहे.