शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी.एन. गुजराथी यांचे प्रतिपादन

बदलत्या काळानुसार समाज माध्यमांमुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याने त्यापासून मुलांना पालकांसह शिक्षकांनी परावृत्त करावे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ तथा प्राचार्य डॉ. डी. एन. गुजराथी यांनी केले आहे.

शहरातील कॉलेज रोडवरील डिसूझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या सभागृहात ताराबाई साळी यांच्या स्मृतीनिमित्त १३ शिक्षकांना डॉ. गुजराथी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. गुजराथी बोलत होते.

शैक्षणिक क्षेत्रात ‘क्लास’ नावाचा व्यवसाय सुरू आहे. नेहमीच्या चौकोनी कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या सर्वागीण विकासाबरोबरच शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम घेत असतात. लोकशाहीमुळे शिक्षण पद्धतीत सातत्याने बदल होत असल्यामुळे शैक्षणिक परिस्थिती भयावह झाली असल्याचे डॉ. गुजराथी यांनी सांगितले.प्रारंभी अंजली कोरान्नोर यांनी प्रार्थना म्हटली. मंगल पोतदार यांनी स्वागतगीत सादर केले. मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी यांनी स्वागत केले.

उपाध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सत्कारार्थीच्या वतीने सीमा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. आशा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. उपसचिव प्रा. प्रदीप देवी यांनी आभार मानले.