स्वयंपाकासाठी लागणारी ऊर्जेची गरज सौरऊर्जेद्वारे भागविणारे विविध आकारांतील लहान तसेच अवाढव्य सोलर कुकरचे थक्क करणारे येथील प्रा. अजय चांडक यांनी केलेले संशोधन पाहून विदेशी पाहुणे चकित झाले. अगदी अडीच हजार रुपयांपासून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कमीतकमी जागेत बसविता येणारे तसेच अगदी दोन ते ३५ हजार लोकांचे जेवण एकाच वेळी तयार होईल, असे सोलर कुकरचे डिझाइन प्रा.चांडक यांनी केले आहे. याची माहिती या वेळी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींनी घेतली. स्वच्छ ऊर्जासंदर्भात आयोजित अभ्यास दौरा व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अवधान औद्योगिक वसाहतीतील प्रा. अजय चांडक यांच्या सोलर रिसर्च व ट्रेनिंग सेंटरला विविध २५ देशांतून आलेल्या सुमारे ४६ प्रतिनिधींनी भेट दिली. एकाच वेळी विविध देशांतील प्रतिनिधी या ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोलर कुकर इंटरनॅशनल या अमेरिकेतील संस्थेतर्फे सहावी जागतिक परिषद बडोदा येथील मुनी सेवा आश्रमात घेतली. या परिषदेसाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींपैकी २५ देशांतील ४६ प्रतिनिधी येथे आले होते. यात मुनी सेवा आश्रमाचे दीपक गढीया, इंदूरच्या मॅक गिलिगन, युक्रेनचे डॅनियल, हेलन फ्युअरमेन, सोलर कुकर इंटरनॅशनलच्या कार्यकारी अध्यक्ष ज्युली ग्रीन, वंदना शिवा, प्रा. सोहोनी, जगत शहा यांच्यासह बल्गेरिया, स्पेन, चिली, युगांडा, केनिया, कॅनडा, नायजेरिया यांसह विविध देशांतील प्रतिनिधींचा समावेश होता. या वेळी सोलर कुकरच्या माध्यमातून दोन लोकांपासून अगदी ३५ हजार लोकांचे जेवण एका वेळी कसे तयार होऊ  शकते याचे प्रात्यक्षिक दाखविले. राहुल कुलकर्णी यांच्या कंपनीत सोलर कुकर तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. चांडक यांनी सोलर कुकरचे आयुष्य २० वर्षांचे असल्याचे सांगितले. सर्वात मोठय़ा सोलर कुकरला शेफलर सोलर कुकर संबोधले जाते. असे कुकर शिर्डी संस्थान व तिरुपती संस्थान येथे लावण्यात आले आहेत. तसेच मोठय़ा समारंभासाठी मोठय़ा आकाराच्या सोलर कुकरचा वापर केला जातो. या ठिकाणी केवळ सोलर कुकरचे संशोधन करून डिझाइन तयार करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याची माहिती दिली. सौरऊर्जेवरील सोलर कुकरच्या संशोधनाची माहिती घेण्यासाठी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींनी या वेळी सौरऊर्जेवर भाजलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला.