शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलीस यंत्रणा ठिम्म असल्याची सर्वसामान्यांमध्ये भावना बळावत असताना काही भागांत वरिष्ठ अधिकारी धडक मोहिमांद्वारे पोलिसांचा दरारा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी काही भागांत मात्र तसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ दोनमध्ये पोलिसांनी टवाळखोर, भरधाव वाहने दामटणारे ‘रायडर्स’ यांच्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू केले. तथापि, इतरत्र नीरव शांतता आहे. दोन्ही परिमंडळात एकाच वेळी या स्वरूपाची कारवाई झाल्यास पोलिसांचे अस्तित्व अधिक ठळकपणे अधोरेखित होऊ शकते. मात्र तशी कृती करण्याचा विचारही होत नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याची हिंमत गुन्हेगार दाखवत असल्याची प्रतिक्रिया आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून खून, चोरी, अपहरण, लूटमार, टोळक्यांचा धुडगूस, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काटय़ा मारुती पोलीस चौकीत टोळक्याने पोलिसांदेखत एका युवकावर प्राणघातक हल्ला चढविला. या घटनेने गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे हे अधोरेखित केले. काही वर्षांपूर्वी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. त्याची तुलना थेट बिहारची केली जात होती. कुलवंत कुमार सरंगल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, वाहनांची तपासणी, गुंडांवर मोक्काद्वारे कारवाई आदींचे सत्र राबवून शहरात पोलिसांचा वचक निर्माण केला. इतकेच नव्हे तर, तपास प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपास प्रतिबंध केला. अव्याहतपणे ही कारवाई सुरू राहिल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत झाली होती. सरंगल यांच्या कार्यकाळात थंड झालेल्या गुन्हेगारी टोळक्यांनी मागील काही महिन्यांपासून डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या एकूणच घटनाक्रमात पोलीस यंत्रणेकडून गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ आहेत. त्यात परिमंडळ एकमध्ये सरकारवाडा, गंगापूर, पंचवटी, आडगाव या पोलीस ठाण्याचा समावेश होतो. तर परिमंडळ दोनमध्ये उपनगर, अंबड, सातपूर, देवळाली, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांचा समावेश होता. दोन्ही परिमंडळांत गुन्हेगारी घटनांचा पट थोडय़ाफार फरकाने सारखाच आहे. या पाश्र्वभूमीवर, उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनमध्ये जनसामान्यांना आश्वस्त करण्यासाठी खास मोहीम राबविली. मागील दहा दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिक, महिला व व्यापारी वर्गाच्या तक्रारी जाणून घेत आहेत. दागिने खेचून नेण्याचे प्रकार, पोलीस असल्याची बतावणी करून होणारी लूटमार, घरफोडी व वाहनांची चोरी हे प्रकार रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक व व्हॉट्स अ‍ॅपचा क्रमांकही देण्यात आले. दुसरीकडे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे स्वरूप लक्षात घेऊन लगेच टवाळखोर व भरधाव वाहने दामटणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. परीमंडळ दोनच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळानंतर ही कारवाई झाल्याने सर्वसामान्यांनी त्याचे स्वागत करत ती कायमस्वरूपी ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलीस यंत्रणेकडून एका भागात ही मोहीम सुरू असली तरी शहराच्या दुसऱ्या भागात अर्थात परिमंडळ एकमध्ये तशी काहीच मोहीम राबविली गेली नाही. वास्तविक, एकाच वेळी सर्वत्र मोहीम राबविल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकतो. परिमंडळ एकमध्ये पोलीस चौकीत टोळक्याने तरुणावर हल्ला चढविण्याची घटना घडली होती. तरीदेखील टवाळखोरांविरुद्ध कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे.