महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ५५व्या महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेतील आणि १३व्या बालनाटय़ स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते कलाकार, तंत्रज्ञ व संस्था यांचा नाटय़ क्षेत्रातील रंगकर्मीच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. १५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील महाकवी कालिदास कला मंदिरात हा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
यंदा नाशिक विभागातून नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर या ठिकाणांहून हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत ५५ संस्थांनी तर बालनाटय़ स्पर्धेत ३४ संस्थांनी नाटके सादर केली. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि नगर या स्पर्धा केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील पुरस्कारप्राप्त कलाकारांना नाटय़ क्षेत्रातील रंगकर्मीच्या हस्ते प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, दिग्दर्शन, रौप्यपदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे या वेळी वितरित करण्यात येतील. पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘नमन नटवरा’ हा उमलत्या मनाचा रंगाविष्कार दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन गणेश रेवडेकर यांनी केले आहे. हृषिकेश परांजपे यांनी लेखन केले असून नेपथ्य अजय पुजारे यांचे आहे. नाटय़ रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.