दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांकडूनही प्रबोधन; संकल्पासाठी अनेक शाळांचा सहभाग

नाशिक : नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांकडूनही उत्तम प्रकारे प्रबोधन करण्यात येत असल्याने मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर न करण्याची प्रतिज्ञा अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण येत असते. त्यातच विद्यार्थ्यांमध्ये पतंगांचे वेड अधिक आहे. निव्वळ पतंग उडविण्यात पतंगप्रेमींना मजा येत नाही. दुसऱ्याचा पतंग कापण्यात त्यांना अधिक आनंद होत असतो. त्यासाठीच पतंगप्रेमींकडून मोठय़ा प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर करण्यात येत असतो. हा मांजा एखाद्या दुचाकीस्वाराच्या मानेत अडकल्यास त्याचा गळा कापला जातो. कधी कधी ही जखम जिवावर बेतू शकते. एखाद्या पक्ष्याच्या पंखांमध्ये अडकल्यास पंख फाटून त्यांना उडताच येत नाही. त्यामुळे अनेक पक्षी दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. नायलॉन मांजाचे हे दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांनाही बऱ्यापैकी ध्यानी येऊ लागले आहेत.

येथील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पतंगींसाठी नायलॉन मांजा न वापरण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे आणि मुख्याध्यापिका वैशाली पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष कोल्हे यांनी नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिक यांना होणाऱ्या शारीरिक इजांविषयी माहिती दिली. हे सर्व दुष्परिणाम लक्षात घेऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या संक्रांतीच्या सणाला पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजा न वापरण्याचा संकल्प करून शपथ घेतली. या प्रसंगी सर्व शिक्षकही उपस्थित होते.

सिन्नर येथील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. सलग १० व्या वर्षी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाविरोधी जनजागृती करण्याची प्रतिज्ञा घेतली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी मांजाच्या दुष्परिणांमाविषयी माहिती दिली. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका पोहचत असून मानवासह पशु-पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. नायलॉन मांजाची विक्री आणि वापरावर न्यायालयाने प्रतिबंध घातला असल्याने विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा वापरू नये तसेच त्याचा वापर करू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रचना माध्यमिक विद्यालयात हरित सेनेअंतर्गत रचना इको क्लबद्वारा नायलॉन मांजा न वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण सर्व पर्यावरणाचा एक भाग आहोत, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणातील कोणत्याही घटकाला इतरांपासून त्रास होऊ नये, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणजे पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर न करणे हा होय, असे मार्गदर्शन हरितसेना प्रमुख वैशाली कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा दिली.