सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत संशयित मुख्याध्यापकाने दोन वर्षांपासून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चापडगाव येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत  पीडित युवती दोन वर्षांपासून काम करत आहे.  मुख्याध्यापक सुरेश कापडणीसने आपल्या पदाचा गैरवापर करत तिच्याशी जवळीक वाढविली.  लग्नाचे आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. त्यानंतर कामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त बाहेर नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. मुख्याध्यापक विवाहित असल्याने पत्नीला सोडण्यास त्याने नकार दिला. या सर्व प्रकाराला कंटाळत पीडितेने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या सर्व प्रकारची सखोल चौकशी करत संशयित मुख्याध्यापकास अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्त्री अधीक्षिका नेमण्याची मागणी केली जाते.  आदिवासी विकास विभागही मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्त्री अधीक्षिका नियुक्त करण्यासाठी प्रयत्नरत आहे. तथापि, उपरोक्त घटनेने हा घटकही आश्रमशाळेत सुरक्षित नसल्याचे दर्शविले आहे.