पंचवटी परिसरातील मेरी लिंक रोडवर दीर व भावजयीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भावजयीचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून दिराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंचवटी येथील मेरी लिंक रोडवर लक्ष्मी रेसिडेन्सी सोसायटीत विकास कुमार शर्मा हे पत्नी प्रियासिंग (२७) व भाऊ श्रीरामकुमार (२५) यांच्यासोबत राहत होते. विकासकुमार हे पिंपळगाव येथील कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतले. मात्र बेल व दरवाजा ठोठावूनही घरातील कोणीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी शेजारील रहिवाशांची मदत घेत दरवाजा तोडला.
दरवाजा उघडला असता पत्नी प्रिया हिचा मृतदेह जमिनीवर पडलेला तर भाऊ श्रीरामकुमारने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. शर्मा व आसपासच्या नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, दोघांचा आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे. प्रियासिंग हिचा गळा आवळत श्रीरामकुमारने गळफास घेतला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मात्र या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस हत्या की आत्महत्या याबाबत संदिग्ध आहेत. भावजयीची हत्या करण्यामागे नेमके काय कारण असावे, त्यामागे दिराचा काय संबंध याची छाननी केली जात आहे.