नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बनावट डॉक्टर बिनधोकपणे रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्याचे प्रकार उघडकीस येत असताना आता चक्क जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात तीन महिला डॉक्टरच्या गणवेशात संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित महिलांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून याविषयी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील बाह्य रुग्ण विभागात तीन महिला डॉक्टरांसारखा पोशाख करत फिरत होत्या. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका या बाह्य रुग्ण विभागात आल्यावर त्यांच्या नजरेस या महिला पडल्या. त्यांनी संशय आल्याने संबंधित महिलांकडे विचारणा केली असता आम्हाला निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी कामावर रुजू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे उत्तर ऐकल्याने परिचारिकेस संशय आला. त्यांनी तातडीने तीनही महिलांना रुग्णालय व्यवस्थापनाकडे नेले. त्यावेळी या महिला बनावट संशयास्पद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यातील एक महिलेकडे स्टेस्थास्कोपही आढळून आला.

दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून तीनही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या महिला रुग्णालयात का आल्या, त्यांना कोणी पाठवले, याविषयी गूढ कायम आहे. यातील एक महिला परिचारिका आहे. मात्र अन्य दोन महिलांची माहिती अद्याप समजली नसल्याचे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले. अर्चना केदारे, मेघा शेट्टी (दोघी रा. अशोकनगर), वर्षां लोंढे (रा. मनमाड) अशी या महिलांची नावे आहेत.