स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीनिमित्त सावरकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी भगूर येथे २५ व २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एकनाथ शेटे यांनी दिली आहे.
भगूर येथील शिक्षण मंडळ, मुंबईची स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक समिती, औरंगाबादचे सावरकरप्रेमी मंडळ, ठाणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि भगूर नगरपालिकेच्या वतीने हे संमेलन होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते १० या वेळेत तुळसा लॉन्स येथील सावरकर साहित्यनगरीत सावरकर विचारवादी कार्यकर्त्यांचा मेळवा होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ध्वजारोहण, आठ वाजता नूतन विद्यामंदीर व तिजाबाई झंवर विद्यालयाचे सुमारे पाच हजार विद्यार्थी एका सुरात एकाचवेळी ‘वंदे मातरम्’, ‘जयोस्तुते’, ‘ने मजसी ने परत’ चे गायन करतील. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर मार्गदर्शन करतील. सकाळी नऊ वाजता खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण यांसह बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, योगेश घोलप, सीमा हिरे, राहुल आहेर, अपूर्व हिरे हे आमदार, महापौर अशोक मुर्तडक, ब्रिगेडियर प्रदीपकुमार कौल यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष चंद्रहास शहासने यांच्या संग्रहातील क्रांतिकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. अधिकाधिक सावरकरप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक भाऊ सुरवडकर, कार्यवाह मिलिंद रथकंठीवार, संयोजन समितीचे विजय करंजकर, नगराध्यक्षा अनिता करंजकर आदींनी केले आहे.